आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Painting World, Ravindranath Tagore, Divya Marathi

कलाविश्व : कुत्रा.. रवींद्रनाथ टागोर अन् आकाशच्या चित्रातला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्थळ बाभुळगाव. गावातील मंदिराचा सभामंडप. सगळी मुलं चित्रं काढण्यात दंग झालेली. आकाश संभाजी गिर्‍हे हा नऊ वर्षांचा मुलगाही जमिनीवर बसून चित्र काढण्यात रमलेला. त्यानं चित्रासाठी विषय निवडला होता ‘कुत्रा’. इतर मुलांनीही डोंगर, सूर्य, नदी, पक्षी असं बरंच काही काही चितारलेलं. पण आकाशचा कुत्रा आगळावेगळा होता. बरोबर 86 वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोर यांनी असाच एक कुत्रा रेखाटला होता. विशेष म्हणजे रवींद्रनाथ आणि आकाशच्या कुत्र्याचा फॉर्म बराचसा मिळताजुळता होता..


राहुरी तालुक्यातील कदमराव पवार वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते संभाजी पवार यांनी घेतलेल्या या स्पर्धेस प्रसिद्ध रेखाटनकार श्रीधर अंभोरे व चित्रकार रवींद्र सातपुते उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकणारा आकाश मन लावून चित्र काढत असताना त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीकडे अंभोरे यांचं लक्ष वेधलं गेलं. इतरांपेक्षा हा मुलगा वेगळं काही करतो आहे, हे त्यांना जाणवलं. त्यांनी आकाशचं भरभरून कौतुक करून त्याला बक्षीसही दिलं.


बाभुळगावचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अंभोरे नगरला आले आणि त्यांच्या हातात सतीश काळसेकर संपादन करत असलेला ‘आपले वाड्मय वृत्त’चा फेब्रुवारीचा अंक पडला. या अंकात रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रकलेवरील मुखपृष्ठ कथा होती. अंकाचं पहिलं पान उघडलं आणि रवींद्रनाथांनी काढलेल्या कुत्र्याचं चित्र पाहून अंभोरेंना आठवला आकाशचा कुत्रा. हा कुत्रा काढला ते वर्ष होतं 1928 आणि तेव्हा रवींद्रनाथ होते 67 वर्षांचे. आकाश तर अवघ्या नऊ वर्षांचा. बाभुळगावसारख्या राहुरी तालुक्यातील छोट्याशा खेड्यात रवींद्रनाथांनी काढलेली चित्रं त्याच्या पाहण्यात येण्याचा संभवच नव्हता. पण त्याच्या रेषांनी रवींद्रनाथांशी नातं जोडलं हे मात्र खरं..


बाभुळगावच्या आकाशला लाभलंय प्रतिभेचं देणं..
प्रतिभा कोणत्या वयात जागृत होईल आणि ती किती काळ टिकेल हे कुणालाही सांगता येत नाही. रवींद्रनाथांनी चित्र काढायला सुरुवात केली, तेव्हा ते प्रगल्भ कवी, कलावंत होते. निसर्गातील घटकांची जाण असलेलं निरीक्षण, चिंतन, मनन अशा सुपीक माहोलात काढलेलं ते चित्र आणि रानगवत, बाभुळबनात राहणार्‍या आकाशनं काढलेलं चित्र. आकाशचा बालशैलीतला कुत्रा मला अधिक जवळचा वाटला. त्याचा फॉर्म अप्रतिम आहे. ते चित्र पाहून मी मोहित झालो. जन्माबरोबर कलेचा अवयवही सोबत घेऊन आल्यासारखं वाटलं. रवींद्रनाथांनी वयाच्या नवव्या वर्षी चित्र काढलं असतं, तर ते नक्कीच आकाशच्या चित्राच्या जवळपास जाणारे असते..’’ श्रीधर अंभोरे, प्रसिद्ध रेखाटनकार, नगर.