आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Pune University, Ahmednagar Collage, Divya Marathi

एम. फिल. प्रबंधिकेच्या उचलेगिरीचा प्रताप उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अहमदनगर महाविद्यालयाच्या एम. फिल. व पीएच. डी. संशोधन केंद्रात (पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त) एम. फिल. या पदवीसाठी सन 2012 (27 नोव्हेंबर) मध्ये सादर करण्यात आलेली एक प्रबंधिका फक्त शीर्षक बदलून पूर्वीच्या एका प्रबंधिकेतील मजकुराची जशीच्या तशी नक्कल करून विद्यापीठास सादर करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधिताला एम. फिलही प्रदान करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही विद्यापीठाची फसवणूक आहे. संबंधित विद्यार्थ्याची एम. फिल. परत घ्यावी, तसेच मार्गदर्शकाचीही मान्यता काढून घेण्याची मागणी प्रा. सुधाकर शेलार यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


प्रा. शेलार यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की त्यांनी ‘शिवाजी सावंत यांची लढत कादंबरी : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर प्रबंधिका सादर करून एम. फिल. मिळवली होती. आता संशोधक विद्यार्थी बाबासाहेब रखमाजी कोळसे यांनी आपल्या प्रबंधिकेसाठी ‘र्शी. राजा मंगळवेढेकर यांची भूमिपुत्र कादंबरी : एक चिकित्सक अभ्यास’ हा विषय निवडला. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. चं. वि. जोशी (मराठी विभाग, अहमदनगर महाविद्यालय) यांनी मार्गदर्शन केले. ही प्रबंधिका त्यांनी 27 नोव्हेंबर 2012 रोजी सादर केली. विशेष म्हणजे ही प्रबंधिका पूर्णपणे व अगदी जशीच्या तशी - फक्त शीर्षक बदलून आपल्या प्रबंधिकेची कॉपी करून विद्यापीठास सादर करण्यात आल्याचे प्रा. शेलार यांचे म्हणणे आहे. त्यासाठी शेलार यांनी दोन्ही प्रबंधिकांच्या अनुक्रमणिकांतील विषयसूचीसह काही पानेही आपल्या म्हणण्याच्या पुष्ठय़र्थ निवेदनासह जोडली आहेत.


या फसवणुकीत मार्गदर्शक प्रा. डॉ. जोशी यांचाही सहभाग आहे. ‘भूमिपुत्र’ हे राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेले विठ्ठलराव विखे यांचे चरित्र आहे, कादंबरी नव्हे. असे असतानाही कोळसे यांच्या ‘भूमिपुत्र कादंबरी : एक चिकित्सक अभ्यास,’ अशा चुकीच्या विषयाला डॉ. जोशी यांनी मान्यता दिली, अशी टीका शेलार यांनी केली. वास्तविक पाहता ‘भूमिपुत्र’ हे पुस्तक चरित्र आहे की, चरित्रात्मक कादंबरी याचा संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शकास पुसटशीही कल्पना नाही. कारण ते पुस्तकच या दोघांनी पाहिलेलेच नाही. याचा स्पष्ट पुरावा म्हणजे प्रा. कोळसे यांनी लिहिलेल्या प्रबंधिकेतील सर्व प्रकरणांमध्ये देण्यात आलेली अवतरणे आपल्या प्रबंधिकेतून जशीच्या तशी घेतली असल्याने ती ‘भूमिपुत्र’मधील नसून चक्क ‘लढत’ या कादंबरीतील आहेत. ही विद्यापीठाच्या डोळ्यांत केलेली धूळफेक असल्याचे प्रा. शेलार यांचे म्हणणे आहे.


संशोधनातील अनागोंदी
एम. फिल. आणि पीच. डी. च्या प्रबंध परीक्षणाबाबत अत्यंत अनागोंदी चालू आहे. आपल्या मित्रांकडे एम. फिलच्या प्रबंधिका आणि पीएच. डी. चे प्रबंध पाठवून आपल्या विद्यार्थ्यांना पदव्या मिळवून दिल्या जाताहेत. प्रा. कोळसे यांची एम. फिल. पदवी माघारी घेऊन त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. जोशी यांची मार्गदर्शक मान्यता कायमची रद्द करावी, अशी मागणी प्रा. शेलार यांनी निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे केली आहे.


परीक्षकही दोषी
प्रा. कोळसे यांनी संशोधनचौर्याचा कळस गाठला असल्याचे नमूद करून प्रा. शेलार यांनी मार्गदर्शकांची मान्यता विद्यापीठाने तातडीने रद्द करावी, अशी मागणी केली. ही प्रबंधिका उत्तीर्ण करणारे परीक्षकही (बहिस्थ: व अंतर्गत दोन्हीही) दोषी आहेत. त्यांनी ज्या पुस्तकावर एम. फिल. पदवीसाठीची प्रबंधिका लिहिली गेली आहे ते पुस्तक पाहिलेलेही नाही, वाचण्याची तर गोष्टच दूर. परीक्षकांना तरी कळायला हवे होते की, भूमिपुत्र हे पुस्तक चरित्रात्मक कादंबरी नसून चरित्र आहे. मित्रप्रेमापोटी त्यांना हे कळलेले दिसत नाही, असे प्रा. शेलार यांनी नमूद केले आहे.

विद्यापीठाकडे आधीच तक्रार..
प्रा. कोळसे यांनी प्रा. शेलार यांची प्रबंधिका जशीच्या तशी वापरल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत मी विद्यापीठाकडे तक्रार केली. त्यांची एम. फिल. रद्द करण्याची मागणी प्रा. शेलार यांच्या अगोदरच विद्यापीठाकडे केली. त्याबाबत विद्यापीठ निर्णय घेईल. या प्रकरणात पूर्वग्रह दूषित असलेले काहीजण नाहक माझी बदनामी करत आहेत. प्रा. शेलार व प्रा. कोळसे यांच्या प्रबंधिकेच्या विषयाचा नायक एकच आहे. त्यामुळे ही बाब लक्षात आली नाही. प्रा. कोळसे यांनी याबाबत मला अंधारात ठेवल्याने हा प्रकार घडला.’’ प्रा. डॉ. चं. वि. जोशी, मार्गदर्शक.

न्यायालयात दाद मागू
अशाप्रकारे एम. फिल. व पीएच. डी. चे संशोधन सुरू असेल, तर शिक्षण क्षेत्राला फारसे उज्‍जवल भवितव्य नाही. या प्रकाराच्या मुळाशी जाऊन त्याची चौकशी करावी, तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. विद्यापीठाने ती केली नाही, तर न्यायालयात दाद मागू.’’ प्रा. सुधाकर शेलार, अहमदनगर महाविद्यालय.

प्रबंधिकेतील सर्व शब्द व वाक्यरचनाही एकसारखी..
प्रा. कोळसे यांनी शीर्षक, मनोगत, प्रास्ताविक, अनुक्रमणिका, प्रकरणे, प्रकरणांतील उपमुद्दे, संदर्भसूची, संदर्भ ग्रंथसूची, परिशिष्टे या सगळ्याच बाबींची पूर्णपणे कॉपी केली आहे. ही कॉपी करताना त्यांनी फक्त ‘लढत’ व ‘शिवाजी सावंत’ या शब्दांच्या जागी ‘भूमिपुत्र’ व ‘राजा मंगळवेढेकर’ एवढेच शब्द टाकले आहेत. बाकी सर्व शब्द व वाक्यरचना जशीच्या तशीच आहे. आपण स्वत: वा कोणत्याही त्रयस्थ समितीद्वारे हा प्रकार पडताळून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.