आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Rangabhavan, Divya Marathi, Nagar Municipal Cooperation

एक वर्ष उलटले तरी ‘रंगभवन’चे काम ठप्प, राजकारण्‍यांकडून घोर निराशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या वर्षी 27 मार्चला ‘जागतिक रंगभूमी दिना’चे औचित्य साधून शहरातील नाट्यकर्मींच्या वतीने ‘रंगभवन’मध्ये नटराजपूजन करण्यात आले. प्रलंबित नाट्यगृहाबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, यासाठी ‘रंगभवन’मध्ये ‘तुका झाला पांडुरंग’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्यामुळे रंगभवनचे काम तातडीने मार्गी लागेल व रंगकर्मींच्या हक्काच्या नाट्यगृहाचा प्रश्न सुटेल, अशी नगरकरांना अपेक्षा वर्षभरानंतरही अपेक्षाच राहिली आहे. वर्ष उलटून गेले, तरी अद्याप या रंगभवनचे काम पूर्ण झालेले नाही.
सज्रेपुरा येथील रंगभवन अनेक दिग्गजांच्या पदस्पर्शाने व अभिनयाने पावन झाले आहे. मात्र, मागील काही वर्षांत ते बंद पडून त्याचा उकिरडा झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या पुढाकाराने शहरातील कलाकारांनी नाट्यगृहाच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली.
नऊ वर्षांपूर्वी हक्काच्या नाट्यगृहाच्या मागणीसाठी नाट्यकर्मींनी भर पावसात रंगभवन येथे दिवसभर आंदोलन केले. तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांनी आश्वासन देऊन नाट्यकर्मींना हे आंदोलन मागे घ्यायला लावले. नंतर मात्र या कलाकारांची दिशाभूलच झाली.
सावेडी परिसरातील नाट्यगृह होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत रंगभवन आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी नाट्य परिषदेने महापालिकेकडे केली होती. नंतरच्या महापौर शीला शिंदे यांनी नाट्यकर्मींना दिलासा देत शहर अभियंता, नगररचना अधिकारी अन्य अधिकार्‍यांसह रंगभवनची पाहणी केली. त्यानंतर नाट्यकर्मींनी रंगभवन पुन्हा एकदा उजळण्याचा निर्धार केला. वर्षभरापूर्वी रंगभवनची साफसफाई करून नटराजपूजन करण्यात आले. गेल्या वर्षी जागतिक रंगभूमी दिनी ‘तुका झाला पांडुरंग’ हा नाट्यप्रयोग तेथे सादर झाला.
रंगभवनचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी तीव्र आंदोलनाचा इशाराही नाट्य परिषदेने दिला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. वर्ष उलटले, तरीही रंगभवनचे काम ठप्पच आहे. ते पूर्ण झाले, तरी रंगभवन हे खुले सभागृह असेल. नगरमध्ये हक्काचे बंदिस्त सभागृह व्हावे, अशी रंगकर्मींची मागणी आहे.
गरज सांस्कृतिक दबावगटाची
सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विविध पक्षांकडून आश्वासनांची खैरात होत आहे. परंतु शहरातील रंगकर्मींचे स्वप्न असलेल्या नाट्यगृहाचा मुद्दा कोणाच्याच तोंडून निघत नाही. शहरातील विविध क्षेत्रांतील कलावंत देश-विदेशात नगरचा लौकिक वाढवत आहेत. ज्येष्ठांबरोबर तरुण पिढीही सांस्कृतिक क्षेत्रात आपली पताका फडकवत आहे. या सर्वच कलाकारांनी सभागृहासाठी अनेकदा राजकारण्यांकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. आता सांस्कृतिक दबावगट निर्माण होऊन ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.
हे तर शहराचे दुर्दैव..
नगरमध्ये एखादे तरी बंदिस्त सभागृह व्हावे, ही या शहराची सांस्कृतिक व सामाजिक गरज आहे. त्यासाठी तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात तशी इच्छाशक्ती असलेला नेता नसणे, हे नगरकरांचे दुर्दैव आहे. या शहरात एकही चांगले बंदिस्त सभागृह उपलब्ध नसणे आणि त्याची कोणतीही जाणीव राजकारण्यांना नसणे, हीच मोठी खंत आहे. ‘नगर’चा विकास फक्त ‘न’ळ, ‘ग’टारी आणि ‘र’स्ते याभोवतीच फिरतो, हेच आपले मोठे दुर्दैव आहे.’’ पी. डी. कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी.