आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Sampada Credit Society, State Credit Society Federation

संपदा पतसंस्था विसजिर्त करण्यास संमती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्था अवसायनात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत बहुतांश ठेवीदारांनी संस्था विसजिर्त करण्यास सहमती दर्शवली. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मदतीने अवसायक नियुक्त करून वसुलीला गती देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या दालनात ठेवीदारांची बैठक झाली. सन 2012-13 चे लेखापरीक्षण, सहकार कायदा कलम 88 नुसारच्या वसुलीला औरंगाबाद खंडपीठाकडून मिळालेली स्थगिती, बोगस सोने तारण कर्ज प्रकरण यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, संस्था विसजिर्त करण्याच्या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात झाली. प्रलंबित कारवाई पूर्ण झाल्याशिवाय संस्था विसर्जनाचा निर्णय घेऊ नये, तसेच अवसायक म्हणून शासकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी ठेवीदारांचे नेते अँड. नीळकंठ सोले यांनी केली. अवसायक म्हणून पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती केल्यास वसुलीला गती मिळू शकते, असा मुद्दा हौसारे यांनी मांडला. त्यावरून ठेवीदारांमध्येच बाचाबाची झाली. अँड. सोले बैठक सोडून बाहेर पडले. उर्वरित बहुतांश ठेवीदारांनी संस्था अवसायनाचा अंतिम आदेश काढण्यास व अवसायक म्हणून फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार मार्चअखेर संपदा पतसंस्था विसजिर्त करण्याचा अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.
वसुलीचा आढावा घेण्यासाठी ठेवीदारांचा समावेश असलेली समिती तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. अवसायक नियुक्त करण्यात आल्यानंतर सहकार कायदा कलम 105 नुसारच्या कारवाया तातडीने करता येतील, तसेच फेडरेशनकडे वसुलीची यंत्रणा असल्याचा फायदा होणार असल्याचे हौसारे यांनी सांगितले. फेडरेशनशी संलग्न असलेल्या जिल्हा स्थैर्य निधीने संस्थेच्या 12 कोटी रुपये थकीत कर्जाच्या वसुलीची जबाबदारी घेतली आहे. सायंकाळी फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन हौसारे यांनी वसुलीचा आढावा घेतला.
नऊ ठेवीदारांची समिती
पतसंस्थेबाबत निर्णय घेण्यासाठी नऊ ठेवीदारांची समिती शनिवारी नेमण्यात आली. या समितीत सुरेश म्हस्के, उद्धव अमृते, दिलीप भट, संपत खेडकर, संतोष ओस्तवाल, संदीप चौगुले, दिनकर थोरात, चंद्रभान खुळे, ललित झेंडे यांचा समावेश आहे. निर्णय घेऊन समन्वय ठेवण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे.
किमान मुद्दल परत मिळू शकेल
संस्थेत 19 हजार ठेवीदारांच्या 32 कोटींच्या ठेवी आहेत. स्थैर्यनिधीकडून वसुलीला सुरुवात झाली असून धनादेशाने किमान मुद्दल परत करता येईल, अशी परिस्थिती आहे. कलम 88 च्या कारवाईला मिळालेल्या स्थगितीबाबत 27 मार्चला खंडपीठात सुनावणी होणार आहे. स्थगिती उठण्याची अपेक्षा आहे.’’ दिगंबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक, नगर.