आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Sangamner Municipal Council, Tax, Divya Marathi

संगमनेर पालिकेने थकवले जल उपकराचे 66 लाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - थकबाकी किंवा चालू वर्षाच्या विविध करांची रक्कम वसूल करण्यासाठी सामान्य नागरिकाचा साध्या प्रकारचाही ‘दाखला’ अडकवून ठेवणार्‍या पालिकेने शासनाचे जल उपकराचे तब्बल 66 लाख थकवले आहेत. वारंवार मागणी करूनही पालिकेने अद्याप एक छदामही या थकबाकपोटी भरला नसल्याचे समोर आले.


महसुली खर्च भागवण्यासाठी आणि येणारी तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी करवाढीचा बोजा लादणार्‍या पालिकेने गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जलउपकराचा भरणा केला नाही. यावर्षी ही रक्कम तब्बल 66 लाखांच्या घरात गेल्याने एवढा मोठा खर्च भागवण्यासाठी पालिका काय पावले उचलते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपवाद वगळता पालिका सातत्याने सत्ताधारी काँग्रेसच्या ताब्यात आहे. 1990 पासून अस्थिरतेचे वातावरण संपवून पालिकेचा कारभार योग्य रीतीने सुरूअसल्याचा दावा सत्ताधारी नेते वारंवार करतात. मात्र, त्यापूर्वीपासून किरकोळ स्वरूपात असलेली जल उपकराची रक्कम भरण्यासाठी गेल्या 30 वर्षांत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ही रक्कम 66 लाख 22 हजार 402 रुपयांवर गेली आहे. ही थकबाकी शासन माफ करेल, असा आशावाद येथील नेत्यांना असल्याने त्यांनी ही रक्कम भरण्याकडे कानाडोळा केला. आता मात्र दंडासह ही रक्कम पालिकेकडून वसूल केली जाणार आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यासाठी दर महिन्यास पालिकेला नोटीस पाठवून ही रक्कम वसूल करण्यासाठी पाठपुरावा करत असतात. मात्र, नोटिशीला पालिकेचे पदाधिकारी केराची टोपली दाखवतात. गेल्या वर्षी ही रक्कम भरता यावी यासाठी पालिकेने अंदाजपत्रकात यासाठी तरतूद केली. सामान्य माणसावर करवाढीचा बोजा टाकणारी पालिका शासनाच्या कराचे पैसे भरत नसल्याने काही काळानंतर थकबाकीसह हे पैसे भरण्यासाठी पुन्हा नागरिकांच्या मानगुटीवर नव्या करवाढीचे भूत बसवले जाण्याची शक्यता आहे.


पैसे उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने दिले जातील
जल उपकराची पालिकेला थकबाकी देणो आहे. यासंदर्भात संगमनेर पालिकेकडे अशी कोणतीही मागणी झालेली नाही. तसेच त्यासाठीचे पैसे देण्याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र, पैसे उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने ते देण्यात येणार आहेत. दिलीप पुंड, नगराध्यक्ष.


पालिका सांडपाण्याचे प्रोसेसिंग करत नाही
नदीपात्रात सोडलेल्या सांडपाण्याचे पालिका प्रोसेसिंग करत नाही. यासंदर्भातील दंडाचा या मोठय़ा रकमेत समावेश असण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांत हे पैसे भरले गेले नाहीत. अँड. श्रीराम गणपुले, विरोधी नगरसेवक.


तीन लाख रुपये भरले
जल उपकराची निश्चित थकबाकी सांगता येणार नाही. नदीपात्रातून उचललेल्या पाण्यासाठीच्या स्वरूपात या पैशाची मागणी असते. आतापर्यंत हे पैसे भरलेले नाहीत. यावर्षी तीन लाख रुपये भरले आहेत. श्रीनिवास कुरे, मुख्याधिकारी.