आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Shirdi Lok Sabha Constituncy Candidature

निवडणुकीचा आखाडा: शिर्डीतील उमेदवारीत घोलप नवा भिडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी लहू कानडे, आमदार बबनराव घोलप, तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले सदाशिव लोखंडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.कानडे आणि लोखंडे यांनी मतदारसंघात संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. घोलप यांनीही शिर्डीत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या तीनही इच्छुकांपैकी फक्त कानडे हे नेवासे तालुक्यातील असल्याने कार्यकर्त्यांना ते जवळचे वाटतात.


पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळाली : खासदार वाकचौरे यांना पराभूत करणे हेच आमचे लक्ष्य राहील. मतदारसंघात आंबेडकरी विचारांची सुमारे 3 लाख मते आहेत. खासदार रामदास आठवले यांचा शिर्डीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी खासदार वाकचौरे यांनीच आम्हाला दिल्याने त्यांच्या पक्षबदलाचा फायदा महायुतीच्या उमेदवारास आम्ही मिळवून देऊ. प्रबळ दावेदार म्हणून आम्ही लोखंडे यांच्या उमेदवारीची मागणी महायुतीकडे करीत आहोत. - जालिंदर वाकचौरे, भाजप, जिल्हा सरचिटणीस.


खासदार वाकचौरेंनी गद्दारी केली
खासदार वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये जाऊन शिर्डी मतदारसंघातील जनतेचा अपमान केला. मागील निवडणुकीत सुमारे दीड लाख मतांनी विजयी केलेल्या सर्व मतदारांशी त्यांनी गद्दारी केली. या निवडणुकीत शिवसैनिक त्यांना धडा शिकवतील. मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून पराभूत झालेले खासदार आठवले यांच्या सर्व कार्यकर्त्यांना वाकचौरेंना पराभूत करण्याची संधी आहे. कारण आठवले आता महायुतीसोबत आहेत. मातोर्शीवरून शिवसेनेचा जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी सैनिक मनापासून काम करतील. -मच्छिंद्र धुमाळ, शिवसेना तालुकाप्रमुख, अकोले.


संधी दिल्यास निवडणूक लढवणार
शिर्डी मतदारसंघातील महायुतीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मी उमेदवारी करावी, असा आग्रह धरला आहे. सध्या देशभरात पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट आहे. या लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होतील. नेत्यांचे पाठबळ, कार्यकर्त्यांची साथ व मतदारांची पसंती मिळाल्यास वाकचौरे यांचा पराभव करून यशस्वी होण्याची खात्री वाटते. सेनेने संधी दिल्यास निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. सदाशिव लोखंडे, इच्छुक उमेदवार.