आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Thefts Fired Seven Times In Shirdi

शिर्डीत भरदुपारी गुंडांकडून गोळीबाराच्या सात फैरी,ट्रॅव्हल एजन्सीतील व्यक्ती होती लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिर्डी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बुधवारी दुपारी भर रस्त्यावरून एका ट्रॅव्हल दुकानातील व्यक्तीवर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडल्याने काही काळ शिर्डीत प्रचंड घबराट निर्माण झाली. दरम्यान, शिर्डी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अज्ञात गोळीबार करणारे चारचाकीतून पसार झाले.


नगरपंचायतीला लागून असलेल्या कनकुरी रोडवर असलेल्या साईकृपा हॉटेलजवळील नॉव्हेल्टी ट्रॅव्हल्स चालविणारे शिवाजी सोपान चौधरी (रा. नांदुर्खी) हे तेथे बसलेले असताना एक चारचाकी गाडी आली. गाडीतून चौघे जण उतरले.त्यातील दोघांनी काही कळायच्या आत गोळीबार केला. यापैकी दोन गोळ्या शिवाजी चौधरी यांच्या खांद्याला चाटून गेल्या, तर एक गोळी खुर्चीत घुसली. आरोपींनी एकूण सात गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते गाडीतून फरार झाले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने एकच पळापळ झाली. जखमी शिवाजी चौधरी यास साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


शिर्डीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, गँगवारमधून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनेची खबर मिळताच डीवायएसपी विवेक पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार, सहायक फौजदार गलांडे मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. अनेक भागांत नाकेबंदी करण्यात आली. जखमीकड़ून आरोपीची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. शिर्डीत अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक वावरत असून, त्यांच्याकडे गावठी कट्टे व धारदार शस्त्रे असल्याचे बोलले जाते. यापूर्वीही खुनाचे प्रकार शिर्डीत घडलेले आहेत. दरम्यान, पोलिस रात्री उशिरापर्यंत आरोपींच्या मार्गावर होते.