नगर - जागतिक महिलादिनी (8 मार्च) शाळकरी मुलींची छेड काढून जिवे मारण्याची धमकी देणार्या तीन आरोपींना आठवडा उलटल्यानंतर पोलिसांनी अटक केली. विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने या आरोपींना 18 पर्यंत पोलिस कोठडी दिली. हा संतापजनक प्रकार नागापूर परिसरात घडला होता. सनी विष्णू चिंधे (नागापूर), विनायक गारुडकर (गांधीनगर) व योगेश काळे (बोल्हेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. नागापूर परिसरातील शाळेतून घरी जाणार्या मुलींना अडवून छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. एका युवकाने गुंडांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यालाच मारहाण केली, तसेच शाळकरी मुलींना जिवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या मुलींनी या घटनेची माहिती चाइल्डलाइन तसेच एमआयडीसी पोलिसांना कळवली. परंतु पोलिस उशिरा घटनास्थळी आले. याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. नंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली. शनिवारी दुपारी त्यांना बी. यू. देबडवार यांच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले.