आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॉटस् अँप’वर हवीय ‘प्रायव्हसी’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - हल्ली ‘अँड्रॉईड मोबाइल’धारकांच्या चर्चेचा विषय असलेल्या ‘व्हॉटस् अँप’ने अलीकडेच दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे या लोकप्रिय ‘अँप’वर आपण केव्हा येऊन गेलो हे ज्याच्याकडे आपला नंबर ‘सेव्ह’ आहे, त्या प्रत्येकाला दिसणारा ‘लास्ट सीन’ हा पर्याय आता लपवता येणार आहे. ‘व्हॉटस् अँप’ वापरणार्‍या अनेकांची तशी मागणी होती. या नव्या बदलाचे तरुणाईने स्वागत केले आहे. त्यामुळे आपले खासगीपण जपले जाईल, असा विश्वास तरुणाईला वाटत आहे. परंतु या स्वातंत्र्याचा गैरवापर अधिक होईल, असा धोकाही काहींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.


यापूर्वी ‘अँड्रॉईड’वर ‘व्हॉटस् अँप’ वापरणार्‍या कुणाचाही नंबर जर ‘सेव्ह’ असेल, तर त्या व्यक्तीने ‘व्हॉटस् अँप’ शेवटचे कधी उघडले ते मित्रांना कळू शकत होते. त्यामुळे बहुतांश वेळा अनेकांना अनावश्यक ‘चॅट’ला सामोरे जावे लागे. ही अडचण दूर करण्यासाठी ‘व्हॉटस् अँप’मध्ये आता खास ‘प्रायव्हसी सेटिंग’ मिळणार आहे. ‘आयओएस’ प्रणालीचे मोबाइल वापरणार्‍यांना ही सुविधा आधीच उपलब्ध झाली होती. आता ‘अँड्रॉईड युर्जस’करिता या ‘अप्लिकेशन’ने आपले ‘प्रायव्हसी सेटिंग’ बदलले आहे. शिवाय त्यात आता दोन नवे ‘फीचर्स’ जोडले आहेत.
जर ‘व्हॉटस् अँप युजर’ आपले ‘स्टेटस’ किंवा ‘प्रोफाइल फोटो’ इतरांना दाखवू इच्छित नसतील, तर तेही लपवण्याचे दुसरे ‘प्रायव्हसी सेटिंग’ या अँप्लिकेशनच्या नव्या ‘व्हर्जन’मध्ये देण्यात आलेले आहे. त्यामुळे ‘प्रोफाईल फोटो’ किंवा ‘स्टेटस’चा गैरवापर कमी होऊ शकणार आहे. शिवाय आता या नव्या ‘प्रायव्हसी सेटिंग’मध्ये ज्यांना आपले ‘लास्ट सीन’, ‘स्टेटस्’ किंवा ‘प्रोफाइल फोटो’ दाखवायचा आहे आणि ज्यांना दाखवायचा नाही, असे गट पाडता येणार आहेत. पण, या नव्या अँप्लिकेशनच्या माध्यमातून पाल्यांवर नजर ठेवणार्‍या पालकांना मात्र आता यापुढे ‘व्हॉटस् अँप’ वापरणार्‍या आपल्या पाल्यांवर ‘लक्ष’ ठेवता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे.


नव्या बदलाची वैशिष्ट्ये
0 ‘लास्ट सीन’, ‘प्रोफाइल फोटो’ आणि ‘स्टेटस’ कुणी पहावे अन् कुणी पाहू नये, हे ठरवता येईल.
0 ‘व्हॉटस् अँप’च्या नव्या सुविधेचा लाभ तूर्तास ‘अँड्रॉईड युर्जस’नाच घेता येईल.
0 या अपडेटमुळे ‘व्हॉटस् अँप’मधील कोणतीही फाईल डिलिट होणार नाही.
0‘व्हॉटस् अँप’चा ‘लूक’ अधिक आकर्षक झाला आहे.
0‘व्हिडिओ’च्या जुन्या पट्टीची जागा एका आकर्षक चौकटीने घेतली आहे.
0‘प्रोफाइल फोटो’ सेट करताना ‘एडिट’ पर्यायासह ‘शेअरिंग’ चिन्हाची भर


तरुणाईसाठी चांगलेच
विनाकारण गैरसमज करुन घेणार्‍या मित्रांमध्ये भांडणे आता कमी होतील. शिवाय आपण मोबाइलवर किती वेळ घालवतो, कॉलेजमध्ये असतानाही ‘व्हॉटस् अँप’वर किती वेळ दवडतो, हे आता पालकांना कळणार नाही. त्यामुळे तरुणाईच्या दृष्टीने हा निर्णय तसा चांगलाच आहे. ’’ अक्षय जोशी, विद्यार्थी


काही असे, काही तसे
खरेतर ‘लास्ट सीन’ हा पर्याय हवाच होता. कारण आपण ‘ऑनलाइन’ असल्याचे दुसर्‍याला कळत होते. पण, आता आपले मित्र कधीपासून ‘ऑनलाईन’ नाहीत, हे कळणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात हा निर्णय तरुणाईसाठी चांगला, तर पालकांच्या दृष्टीने निराशाजनक ठरणार आहे.’’ मृण्मयी कुलकर्णी, विद्यार्थिनी


बदलामुळे ‘प्रायव्हसी’ मिळेल
‘प्रायव्हसी’चा विचार केला, तर ‘हिडन ऑप्शन’ असलाच पाहिजे. ‘व्हॉटस् अँप’वर तुम्ही कार्यालयीन काम किंवा अभ्यास करु शकता. फोटो पाठवू शकता. पण, काही ठराविक मित्रांना ‘हाईड’ करायचा पर्याय हा असलाच पाहिजे. आपल्या फोटोंचा गैरवापर होण्याची भीतीही या बदलामुळे दूर होणार आहे. ’’ इक्शा कुमार,


‘वॉच’पासून मुक्ती
कार्यालयीन काम करणार्‍यांसाठी ‘लास्ट सीन’ हा चांगला पर्याय होता. पण, आता ‘हिडन’मुळे आता तुम्ही ‘ऑनलाइन’ आहात किंवा नाही, हे दुसर्‍याला कळणार नाही. त्यामुळे ‘बॉस’ला कर्मचार्‍यांवर ‘वॉच’ ठेवता येणार नाही. कर्मचार्‍यांसाठी चांगला तर ‘बॉस’करिता निराशाजनक बदल आहे. ’’ तरुण ठाकूर, विद्यार्थी.


नवा बदल अयोग्य
‘लास्ट सीन’ हाच पर्याय योग्य होता. निदान त्यामुळे पारदर्शकता राहात होती. रात्री तुम्ही कधीपर्यंत ‘व्हॉटस् अँप’ वापरले ते पालकांना कळत होते. आता पालकांना ते अजिबात कळणार नाही. त्यामुळे या बदलाचा तरुणाईकडून गैरफायदा घेण्याची शक्यताच अधिक वाढेल, असे मला वाटते. ’’ करण पारिख, विद्यार्थी.


आधीचा पर्यायच योग्य
‘व्हॉटस् अँप’ने खरेतर दोन पर्याय दिलेले आहेत. तरी बहुतांश लोक ‘हिडन ऑप्शन’चाच अधिक वापर करतील. परंतु ‘लास्ट सीन’ हाच चांगला पर्याय होता, असे मला वाटते. कारण त्यामुळे आपले मित्र ‘ऑनलाईन’ होते की नाही ते कळत होते. बदल कसाही असो, तो स्वीकारणे भाग आहे. ’’ देवांग कुर्ला, विद्यार्थी.


आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून
मला वाटते ‘लास्ट सीन’ पर्याय योग्यच होता. या निर्णयाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, त्यावर अवलंबून आहे. आपण ‘चॅट’ करत असलेले कोणाला कळणार नाही, हे चांगले आहे. पण या ‘हिडन ऑप्शन’मुळे आपला मित्र ‘ऑनलाईन’ आहे की नाही, हेच आपल्याला आता कळत नाही. ’’ निकुंज बालानी, विद्यार्थी.


थोडे योग्य, थोडे अयोग्य
उशिरापर्यंत ‘डिस्टर्ब’ न होता आपण ‘चॅटिंग’ करू शकतो. ‘हिडन’मुळे सुरक्षित राहता येते. आपण जे ‘चॅटिंग’ करतो तेही सुरक्षित राहते. त्यामुळे हा निर्णय काही प्रमाणात योग्य, तर काही प्रमाणात अयोग्यही आहे. कारण आई-वडिलांना आपली मुले काय करतात हे आता कळू शकणार नाही. ’’ ममता स्वामी, विद्यार्थिनी.


फोटोंचा गैरवापर होणार नाही
‘व्हॉटस् अँप’चा निर्णय मोठय़ा प्रमाणात योग्यच आहे. आपल्याला विनाकारण त्रास देणार्‍याना आता आपण ‘ऑनलाईन’ असल्याचे कळणार नाही. जेणेकरुन आपल्याला ज्यांच्यासोबत बोलायचे आहे, त्यांच्याशीच आपण निवांतपणे बोलू शकतो. शिवाय आपल्या फोटोचा गैरवापरही होणार नाही. ’’ सानिया थोबानी, विद्यार्थिनी.