आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीने पत्नीसह दोन मुलांची केली हत्या,चिंचोली गुरव येथील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - चिंचोली गुरव येथे तिहेरी हत्याकांडाचा भयंकर प्रकार गुरुवारी उघडकीस आला. पतीने पत्नी व दोन मुलांना अगोदर विष पाजले. नंतर निर्दयीपणे तिघांचाही गळा आवळून खून केला. हे अमानुष हत्याकांड उघडकीस आल्यानंतर तालुका पोलिसांनी काही तासांतच तपास करून मारेकरी पतीच्या मुसक्या आवळल्या.


ज्ञानदेव जगन्नाथ सोनवणे असे आरोपीचे नाव आहे. अलका ज्ञानदेव सोनवणे (35) व मुलगी अपेक्षा (4 ) व मुलगा साई (3) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी घरात या सर्वांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याने आपल्या दुष्कृत्याची कबुली दिली. सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या प्रकरणाचे गूढ उकलले. उपअधीक्षक स्वाती भोर यांनी सायंकाळी चिंचोली गुरवला भेट देऊन घटनाक्रमाची माहिती घेतली.


सिन्नर - संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिंचोली गुरव येथे ज्ञानदेव सोनवणे पत्नी अलका व दोन मुलांसह दोन वर्षांपासून राहत होता. ज्ञानदेव विक्षिप्त स्वभावाचा असल्याने त्याचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. ज्ञानदेवने बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पत्नी अलका, मुलगी अपेक्षा व मुलगा साई यांना विष पाजले. नंतर त्याने अत्यंत क्रूरपणे त्यांचा गळा दोरीने आवळला. गुरुवारी सकाळी तिघांचे मृतदेह घरात पडले असल्याचे लक्षात आले तेव्हा ज्ञानदेव घरी नव्हता. त्यामुळे संशय निर्माण झाला. फरार झालेल्या मारेकरी पतीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली.


आधीची नोंद बदलली
या भयंकर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर प्रारंभी पोलिसांना त्याचा उलगडा झाला नाही. प्रारंभी पोलिस पाटील राजेंद्र मेढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. नंतर कसून तपास केला तेव्हा पतीनेच तिघांचे जीव घेतल्याचे समोर आले. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी छळ व खुनाचा गुन्हा दाखल केला व पतीस अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे तपास करत आहेत.