आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनौरसांकडे बघण्याची दृष्टी बदला..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाजाच्या नैतिक-अनैतिकतेच्या जुनाट कल्पना बुद्धिप्रामाण्यावर आधारित नसल्याने लग्नसंबंधातून निर्माण न झालेल्या बालकांना पूर्वग्रह, तिरस्कार आणि घृणेने वागवले जाते. अशा बालकांचे पालक, विशेषत: पिता अनौरस असतात. परंतु सामाजिक अन्याय, अत्याचार मात्र निष्पाप-निरपराध बालकांवरच केले जातात. अनौरसांकडे पाहण्याची समाजदृष्टी बदलण्यासाठी अशा बालकांना घर, परिवार आणि उज्ज्वल भविष्याची आशा मिळावी म्हणून मागील एक दशकापासून स्नेहालय संस्थेचे स्नेहांकूर दत्तक विधान केंद्र करत असलेल्या प्रयत्नांना ‘हॅन्ड ऑफ होप’ हा माहितीपट मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन या माहितीपटाचे दिग्दर्शक कामोद खराडे यांनी नुकतेच केले.


हॅन्ड ऑफ होप या माहितीपटाचा लोकार्पण सोहळा माय सिनेमा चित्रपटगृहात झाला. यावेळी सुजाता आणि रमेश वाबळे, प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अँलन वॅगनर, जागतिक कीर्तिचे संगीतकार लॅरी थ्रॅशर, महिलांसाठी काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या किटी मूर, अमेरिकेतील प्रख्यात माहितीपट निर्माते टॅफनी आणि निक स्टीव्हरसन, पोलिस अधिकारी चंद्रशेखर सावंत आणि राहुल पवार, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रा. बापू चंदनशिवे, निंबळक येथील भाऊसाहेब गायकवाड, अभिनेते डॉ. सुरेश शिंदे, कामगार नेते योगिराज खोंदे आदी उपस्थित होते.


खराडे म्हणाले, भारतातील अनौरस आणि बेवारस बालके, कुमारी माता आणि बालमाता या विषयाचा आवाका प्रचंड आहे. पन्नास तासांच्या चित्रीकरणातून नेमकी माहिती, मुलाखती निवडून माहितीपट तयार करणे हे जबरदस्त आव्हान होते. परंतु या प्रश्नांवर अगदी सहजपणे अहोरात्र कार्यरत असलेला स्नेहांकुराचा सर्मपित कार्यकर्त्यांचा संच पाहिल्यावर हे आव्हान पेलण्याची हिंमत मिळाली.


‘आईनस्टाईन रिंग’ या निर्मिती अभियानाद्वारे ‘हॅन्ड ऑफ होप’प्रमाणेच इतर महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आणि संस्थांच्या कार्यावर कुठेली मानधन न घेता समाजाच्या जाणिवा प्रगल्भ करणारे माहितीपट निर्माण केले जातील, असे खराडे म्हणाले.


प्रास्ताविकात डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, भारतात 5 कोटींहून अधिक बालके घर आणि आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने बेघर, निराधार बालकांची संख्या वाढत असताना त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दूषित दृष्टिकोन आणि पूर्वग्रह बदलण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. दत्तक विधानासारख्या सामाजिक स्वीकार आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियांचे रूपांतर सामाजिक चळवळीत करणे समाज स्वास्थ्यासाठी अनिवार्य आहे. स्नेहालय आणि स्नेहांकूर परिवार या संदर्भात अडचणींवर मात करून काम कसे करता येईल, याची प्रेरणा तयार करत आहे. अशा समाजातून उभ्या राहणार्‍या स्वयंप्रेरित, स्वयंप्रेरित आणि स्वयंपूर्ण प्रयत्नांमधून बालकांसाठी हिंसा आणि भेदभावमुक्त नवे जग निर्माण होऊ शकते. त्यासाठी नवे दृष्टिकोन आणि अनुभव मांडण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला.
स्नेहालय आणि स्नेहांकूर परिवारातर्फे फिरोज तांबटकर, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, ज्योती एकबोटे, संजय गुगळे, डॉ. सतीश राजमाचीकर, मिलिंद कुलकर्णी, राजीव गुजर, अनिता व अजित माने यांनी या माहितीपटास सहयोग देणार्‍यांचा गौरव केला.


सर्वत्र पोहोचवणार
हा माहितीपट इंग्रजी, मराठी, स्पॅनिश आणि पोलिश या भाषांमध्ये सध्या उपलब्ध आहे. लवकरच सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांत हा माहितीपट उपलब्ध केला जाईल. हा माहितीपट विविध सामाजिक संस्था, संघटना, शिक्षण संस्थांमध्ये दाखवला जावा, असा प्रयत्न आहे.