आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagar News On Politics, Ahmednagar Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगले ‘नाराजी’नामा नाट्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेली महापालिकेची पहिलीच सभा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता राठोड यांच्या राजीनामा नाट्याने गाजली. सभेच्या शेवटी अचानक राठोड यांनी आपला राजीनामा व्यासपीठावर बसलेल्या आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासमोर ठेवून संपूर्ण सभागृहाला धक्का दिला. या अनपेक्षित प्रकारामुळे शिवसेना नगरसेवकांची चांगलीच पळापळ झाली. अखेर राठोड यांचा राजीनामा रोखण्यात त्यांना यश मिळाले. राजीनामा देण्याचे कारण मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले.


स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, तसेच पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी दुपारी विशेष सभा झाली. सभेत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप व मनसे या पाचही पक्षांच्या गटनेत्यांनी दोन्ही समित्या व स्वीकृत सदस्यांची नावे बंद लिफाप्यात महापौरांना सादर केली. सर्व सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका अनिता राठोड यांनी अचानक व्यासपीठावर जाऊन आयुक्तांसमोर आपला राजीनामा ठेवला.


राठोड यांनी मागणीचे निवेदन दिले, असा समज सुरूवातीला उपस्थित नगरसेवकांचा झाला. परंतु प्रकरण काही वेगळेच आहे, असे लक्षात येताच शिवसेनेचे गटनेता संजय शेंडगे यांच्यासह नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, उमेश कवडे आदींनी व्यासपीठावर धाव घेतली. शिंदे यांनी प्रथम आयुक्तांसमोर ठेवलेला राठोड यांचा राजीनामा उचलला, त्यानंतर त्यांनी राठोड यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शिवसेनेसह इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही व्यासपीठावर गर्दी केली. राठोड यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य होते. शिवसेनेचे नगरसेवक त्यांना समजावत होते, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या गोंधळातच सभा आटोपली, आयुक्तही निघून गेले. त्यामुळे राठोड यांनी पतीसह पुन्हा आयुक्तांच्या दालनात ठाण मांडले. आयुक्त जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शिवसेनेच्या नगरसेवकांसह नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक अँड. अभय आगरकर यांनी राठोड यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर राजीनामा देण्यासाठी अडून बसलेल्या राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी प्रभारी उपायुक्त विश्वनाथ दहे आयुक्तांच्या दालनात आले. परंतु शिवसेना नगरसेवकांनी शेवटच्या क्षणी राठोड यांची मनधरणी करून त्यांना महापालिका कार्यालयातून बाहेर नेले.


राठोड यांच्या या अनपेक्षित राजीनामा नाट्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ उडाला. राठोड या आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबातील असूनही त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली, याचीच सर्वांना उत्सुकता होती. परंतु राठोड यांनी राजीनामा देण्याचे कारण शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवले. त्यांच्या राजीनामा नाट्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर झालेली पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा गाजली.


असे घडले राजीनामा नाट्य
* आयुक्तांच्या दालनात पती राजेंद्र राठोड यांच्या मनधरणी करताना.
* अनिता राठोड यांच्या कार्यकर्त्यांना शांत करताना अनिल शिंदे.
* नगरसेवक अनिल शिंदे यांनी अनिता राठोड यांचा राजीनामा उचलला.
* महापौर व उपमहापौरांच्या हस्ते नवनिर्वाचित स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.


तीन दिवसांत खुलासा करा..
स्वीकृत सदस्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे काँग्रेसचे गटनेता संदीप कोतकर यांना प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. प्रदेश कमिटीने स्वीकृत पदासाठी अनंत देसाई यांचे नाव सूचवले होते. परंतु कोतकर यांनी सुभाष लोंढे यांची निवड केली. त्यामुळे प्रदेश कमिटीच्या आदेशाचा भंग झाला असून याबाबत तीन दिवसांत खुलासा करा, अशी नोटीस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश कमिटीचे सरचिटणीस अँड. गणेश पाटील यांनी कोतकर यांना बजावली आहे.

महिला व बालकल्याणचा घोळ
महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड करताना राष्ट्रवादी व अपक्ष विकास आघाडीकडून नगरसेविका आशा पवार यांचे नाव सूचवण्यात आले. नगरसचिवांनी सभेत हे नाव वाचून दाखवले. त्यावर महापौर जगताप यांनी रुलिंगही दिले. परंतु सभेच्या इतिवृत्तात पवार यांच्याऐवजी अपक्ष नगरसेविका नसीम खान यांचे नाव घेण्यात आले. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीचे सदस्य नेमके कोण? असा संभ्रम निर्माण झाला आहे. नगरसचिवांनी शेख यांचेच नाव सभेत वाचून दाखवले असल्याचा दावा महापौर संग्राम जगताप यांनी केला.


‘स्वीकृत’मुळे घडले राजीनामा नाट्य?
तौलनिक संख्याबळानुसार पाचपैकी एक स्वीकृत सदस्यपद शिवसेनेच्या वाट्याला आले. या पदासाठी आमदार राठोड यांनी एका कार्यकर्त्याला शब्द दिला होता. नगरसेविका अनिता राठोड यांचे पती राजेंद्र हे त्यास साक्षीदार होते. असे असतानाही ऐनवेळी आमदारपुत्र विक्रम राठोड यांची स्वीकृत म्हणून निवड करण्यात आल्याने राजेंद्र राठोड यांच्यासमोर पेच निर्माण झाला. हा पेच सोडवण्यासाठी त्यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र वापरले, अशी चर्चा महापालिका व शहरातील राजकीय वतरुळात सुरू आहे.

स्थायी सभापतिपदाचे दोन दावेदार
महापालिकेत सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या स्थायी समिती सदस्यांच्या निवडी पूर्ण झाल्या. आता सभापतीची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या सदस्यांपैकी अपक्ष नगरसेविका व राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करणार्‍या उषा ठाणगे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले यांचाही सभापतिपदासाठी विचार होऊ शकतो. त्यामुळे या पदासाठी खर्‍या अर्थाने हे दोनच प्रबळ दावेदार समजले जातात.


स्वीकृत सदस्य
0 कैलास गिरवले (राष्ट्रवादी)
0संजय घुले (राष्ट्रवादी)
0सुभाष लोंढे (काँग्रेस)
0विक्रम राठोड (शिवसेना)
0अभय आगरकर (भाजप)


मनपा स्थायी समिती
संपत बारस्कर, विजया दिघे, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब बोराटे, कुमार वाकळे (राष्ट्रवादी व अपक्ष विकास आघाडी), सुनीता मुदगल, शारदा ढवण, उमेश कवडे, सचिन जाधव (शिवसेना अपक्ष विकास आघाडी), फय्याज शेख, सुनीता कांबळे - (काँग्रेस), नंदा साठे, दत्तात्रेय कावरे (भाजप), किशोर डागवाले - (मनसे), उषा ठाणगे, दीप चव्हाण (महासभेकडून नियुक्ती)


महिला व बालकल्याण समिती
सुनीता भिंगारदिवे, आशा पवार, इंदरकौर गंभीर, कलावती शेळके, मंगला गुंदेचा (राष्ट्रवादी व अपक्ष विकास आघाडी), दीपाली बारस्कर, छाया तिवारी, सुनीता फुलसौंदर, विद्या खैरे (शिवसेना अपक्ष विकास आघाडी), रुपाली वारे, जयर्शी सोनवणे (काँग्रेस), मालन ढोणे, उषा नलावडे (भाजप), वीणा बोज्जा (मनसे), ख्वाजाबी कुरेशी, सविता कराळे (महासभेकडून नियुक्ती)