आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagar News On Politics, Sangamner Municiple Council

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगमनेर पालिकेचेही मत‘लाभी’ धोरण !, निवडणूकीच्या तोंडावर करवाढ नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना जाहीर होत असतानाच आता संगमनेर पालिकाही मत‘लाभी’ धोरण अवलंबणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ या वर्षी केली जाणार नसून नागरिकांना भार ठरलेल्या युझर चार्जेसच्या दरात निम्म्याने कपात केली जाण्याची शक्यता आहे.


हायटेक होत चाललेल्या संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. अपवादात्मक स्थिती वगळता विरोधकांना फारसे यश कधी मिळाले नाही. पालिकेचा गाडा चालवण्यासाठी कररूपाने जमा होणारे महसुली उत्पन्न तोकडे असल्याने पालिकेला विकासकामांसाठी शासकीय अनुदानावर अवलंबून राहावे लागते. उत्पन्नाचे नवीन स्रोत पालिकेने निर्माण करण्याची गरज दरवर्षी भासते. शहरात उभ्या राहिलेल्या विविध सार्वजनिक इमारतींचे बांधकामही शासकीय अनुदानातून झाले आहे. पाणी पुरवठय़ासाठीचे कर्जहप्ते, कर्मचार्‍यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे वेतन, वीजबिल आदींवरील खर्च पालिकेच्या आवाक्याबाहेर जात असल्याने दरवर्षी पालिका मोठय़ा प्रमाणात नागरिकांवर कराचा बोजा लादत असते.


व्यावसायिक गाळ्यांचा अपवाद वगळता पालिकेला फारसे उत्पन्न उभे करता येत नाही. त्यामुळे नागरिकांवर बर्‍याचदा बांधकाम, पाणीपट्टी व घरपट्टी वाढीचा बोजा लादला जातो. दरवर्षी करवाढीला सामोरे जाणार्‍या नागरिकांसाठी पालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे पांढरा हत्ती असतो. कराच्या तुलनेत कोणत्याही सुविधा नागरिकांना मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरकरांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पुरेशा दाबाने पालिका पाणी देऊ शकत नाही. ‘आडातच नाही, तर पोहर्‍यात कोठून येणार’ अशी स्थती असल्याने वर्षातील निम्म्याहून अधिक दिवस पालिकेवर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते.


‘युजर चार्ज’
गेल्या वर्षी 20 लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर करताना पालिकेने संगमनेरकरांवर नव्याने ‘युजर चार्जेस’ लागू केला. घरगुती आणि वाणिज्य अशा प्रकारात प्रतिचौरस मीटरप्रमाणे हा कर घेण्याचे निश्चित झाले. आधीच करवाढीने ग्रासलेल्या संगमनेरकरांनी त्याला विरोध केला होता. मात्र, सत्ताधार्‍यांनी दाद दिली नाही. या वर्षी हा कर कमी होण्याची शक्यता आहे.


गतवर्षी झाली होती करवाढ
युजर चार्जेसबरोबरच संगमनेरकरांवर दिवाबत्ती, प्रदर्शन, पर्यावरण व जलनिस्सारणसह आणखी काही कराच्या वाढीचा बोजा येऊन पडला. पाणीपट्टी दीड हजारांवरून 1700 रुपये करण्यात आली. गतवर्षी दिवाबत्ती, पर्यावरण, जलनिस्सारण करात एक टक्क्याने वाढ करण्यात आली होती.