आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पंचायत समितीचे 15 जुलैला स्थलांतर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर पंचायत समितीच्या नवीन वास्तूतील फर्निचरचे काम अपुरे असल्यामुळे सत्ताधारी शिवसेना, भाजप व काँग्रेस सदस्यांनी बहिष्कार घातला होता. परंतु चार महिन्यांनंतर नव्या वास्तूत कार्यालय स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या असून 15 जुलै रोजी स्थलांतर होणार आहे. मात्र, अद्यापही नवीन वास्तूतील काम अपूर्णच आहे.

पंचायत समितीसाठी 1 कोटी 43 लाखांची भव्य वास्तू रेल्वेस्टेशन जवळ बांधण्यात आली. मार्च महिन्यात राष्ट्रवादीने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटन कार्यक्रम ठरवताना राष्ट्रवादीने आपल्याला विचारात घेतले नाही, याचा राग सत्ताधार्‍यांना होता. नव्या इमारतीत फर्निचर नाही. त्यामुळे कामकाज होणार नाही. त्यामुळे उद्घाटनाची घाई का, असा पवित्रा घेत सत्ताधार्‍यांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

पण त्याच इमारतीत पंचायत समिती कार्यालय हलवण्याचा घाट आता सत्ताधार्‍यांनी घातला आहे. विशेष म्हणजे आजमितीला त्या इमारतीत फर्निचरचे कोणतेही काम झालेले नाही. या कामासाठी फक्त 53 लाखांचा निधी मंजूर आहे. पंचायत समिती इमारत स्थलांतराबाबत 5 जुलैला झालेल्या मासिक सभेत चर्चाही झाली. आमदार शिवाजी कर्डिले, शशिकांत गाडे यांच्याशी चर्चा करून नवीन तारीख ठरवली आहे.

लबाडी झाली उघड
राष्ट्रवादीने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पंचायत समितीचे उद्घाटन मार्चमध्ये केले. या इमारतीसाठी निधी त्यांच्या सरकारने दिला होता. पण फर्निचरचे काम अपूर्ण म्हणत सत्ताधार्‍यांनी या इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार घातला होता. आता अपूर्ण काम असतानाही सत्ताधार्‍यांना इमारतीत जाण्याची घाई झाली आहे. यातून त्यांची लबाडी उघड होत आहे.’’ केशव बेरड, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.