आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-परळी रेल्वेचा खर्च गेला तीन हजार कोटींवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पंधरा वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला झालेल्या विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला आहे. आठशे कोटींचा प्रकल्प आता तीन हजार कोटी रुपयांच्या घरात गेला असून यापुढे लागणारा विलंब या खर्चात आणखी वाढ करणारा ठरणार आहे.

नगरहून परळीपर्यंतच्या रेल्वेमार्गाला 1998 मध्ये मंजुरी मिळाली. सन 2000 मध्ये या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आठशे कोटी रुपयांच्या घरात होता. मात्र, काम सुरू होण्यास लागलेल्या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात सध्या चौपट वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. नगरपासून साडेबारा किलोमीटर रेल्वेट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील भागातील शेतकरी भूसंपादनाच्या मुद्यावर न्यायालयात गेल्याने काम रखडले आहे. भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यास नारायणडोहपर्यंत पंधरा किलोमीटरच्या ट्रॅकचे काम पूर्ण होणार आहे. संबंधित शेतकर्‍यांचे सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तयार झालेल्या साडेबारा किलोमीटरपर्यंतच्या ट्रॅकचे टेस्टिंग घेण्यात आले आहे.

या मार्गावरील बुरुडगाव ते अरणगाव दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत साडेचार कोटी रुपये खर्चाचा हा उड्डाणपूल बांधून तयार होईल. नगर ते आष्टीपर्यंत मातीच्या भरावाचे काम पूर्ण झाले आहे. आष्टी ते बीडदरम्यानच्या भरावाच्या कामासाठी कार्यारंभ आदेशही निघाला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल. नगर ते बीडदरम्यान असलेल्या लहान-मोठय़ा पुलांचे काम वेगात सुरू आहे. ते या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर निधी मिळून काम सुरू होण्यात मोठा कालावधी वाया गेला. दरम्यान, बीड व नगरच्या खासदारांनी सातत्याने निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. निधीची कमतरता हेच या प्रकल्पाला लागलेले मोठे ग्रहण ठरले आहे. या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्य व केंद्र सरकारकडून प्रत्येकी पन्नास असे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रकल्पाचा खर्च पाहता मिळणारा निधी खूपच तोकडा पडत आहे. वाढीव निधी मिळावा यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. याच प्रमाणात निधी मिळत गेल्यास काम पूर्ण होण्यास आणखी दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यात हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यातून नगरबरोबरच बीडच्या औद्योगिकीकरण व विकासाला चालना मिळू शकेल.

सल्लागार समितीतर्फे प्रयत्न
प्रकल्पाची किंमत पाहता मोठय़ा प्रमाणात निधी मिळण्याची आवश्यकता आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेला निधी खर्चाच्या मानाने नगण्य आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या माध्यमातून वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ हरजितसिंग वधवा, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती.

जनतेच्या सहकार्याची गरज
नगर-नारायणडोहदरम्यानच्या 15 पैकी साडेबारा किलोमीटर मार्गाचेच काम झाले. कारण पुढील अडीच किलोमीटर मार्गात लोकांनी अडथळे निर्माण केले आहेत. नगर तालुक्यात जमिनींच्या किमती वाढत असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे काहीजण न्यायालयात गेले आहेत. वास्तविक पाहता रेल्वेमुळे संबंधित गावांचा मोठा विकास साधला जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी भविष्याचा विचार करून सहकार्य करण्याची गरज आहे.’’ केशव काळे, कंत्राटदार

पाच वर्षांत काम पूर्ण
पहिल्या टप्प्यासाठी आलेल्या निधीतून सध्या कामे सुरू आहेत. प्राप्त निधी अजून अखर्चित आहे. या निधीतून करावयाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. वाढीव निधीसाठी प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. येत्या पाच वर्षांत हा रेल्वेमार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे.’’ दिलीप गांधी, खासदार.