आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिपूर्ण वातावरणात अक्षय्यतृतीया पारणा सोहळ्याची सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी आणि गणेशलाल यांच्या दीक्षा शताब्दी वर्षानिमित्त अक्षय्यतृतीयेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या पारणा सोहळ्याची सोमवारी उत्साहात सांगता झाली. आनंदधाममध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध राज्यांतून आलेले 125 तपस्वी विशेष मुकुट परिधान करून बसले होते. तपस्वींना स्मृतिचिन्ह देण्यात आल्यानंतर उसाचा रस घेऊन त्यांनी पारणा केला.

भाविकांना मार्गदर्शन करताना साध्वी प्रतिभाकंवर म्हणाल्या, ज्ञान, त्याग व वैराग्याचा नजराणा मिळवणारे भाग्यवान आहेत. भगवान ऋषभदेवांनी सुरू केलेली ही परंपरा आजही र्शद्धेने व भक्तीने सांभाळली जात आहे. तपाच्या आराधना व साधनेतून मन, शरीर व वातावरण शुद्ध होते. ज्यांना तप करणे शक्य नाही त्यांनी दिवसभर एक तास मौन पाळावे व नवकार मंत्र जपावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पारणा महोत्सव समिती व साधू-साध्वींकडून अभिनंदन करण्यात आल्यानंतर तपस्वींच्या तपाचा पारणा झाला. रिखबदास संचेती परिवाराच्या वतीने इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती. आनंदधामधील कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी आनंदतीर्थ परिवाराचे कुणाल चोपडा हे सहकार्‍यांसह प्रयत्नशील होते. पारणा महोत्सव समितीतर्फे आनंदधाममध्ये आयोजित केलेला प्रवचन सोहळा, आदिनाथ गाथा, भक्तिसंध्या, युगलधर्म शिबिराबद्दल पारणा महोत्सव समितीचे किशोर पितळे यांनी आभार मानले.

या सोहळ्यासाठी सुमेरमल लुणावत, रमेश गुगळे, गौतम कांकरिया, लक्ष्मीकांत शिंगवी, पुरुषोत्तम दरक, महावीर पाटणी, पंकज फुलपगार, अनिल मुनोत, झुंबरलाल पगारिया, प्रकाश बाफना, विजयकांत कोठारी, शांतीलाल बोरा, किरण बोरा, संपतलाल सुराणा नगरला आले होते. खासदार दिलीप गांधी, सुवालाल गुंदेचा आदी यावेळी उपस्थित होते.

तप केल्याने अंतरंगातील ऊज्रेचे दर्शन
साध्वी प्रितीसुधा म्हणाल्या, तपामागे विज्ञान व शक्ती आहे. तप करणार्‍यांना आपल्या अंतरंगातील ऊज्रेचे दर्शन होते. आनंदधाममध्ये असलेल्या शक्तीची भाविकांना प्रचिती येते. त्यामुळे अक्षय्यतृतीयेला दान करण्यास विशेष महत्त्व आहे. प्रवीणऋषी म्हणाले, माणसाची वाणी मने जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करू शकते. हात एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येऊ शकतात, तर देव, धर्म व गुरू यांचे सत्कार्य पार पाडण्यासाठी पाय पुढे येतात. संतांची भेट घेण्यासाठीच पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.