आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडात अडकलेले नगरचे 100 जण सुरक्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - उत्तराखंडात पावसाने थैमान घातल्याने अडकलेले नगर जिल्ह्यातील 100 भाविक सुरक्षित असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. उर्वरित 300 जणांशी अद्याप संपर्क झालेला नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन (टोल क्रमांक 1077) सुरू केली आहे.

तीर्थयात्रेसाठी सुमारे 400 भाविक उत्तराखंडात गेले होते. पूर व पावसात अडकलेल्या यात्रा कंपनीच्या तेथील प्रतिनिधींशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांनी 100 भाविक सुखरूप असल्याचे सांगितले. तीर्थयात्रेसाठी गेलेल्यांपैकी 242 भाविकांची यादी राज्य सरकारला पाठवली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडगे यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

उत्तर काशी, रुद्रप्रयाग, भागिरथी, हृषिकेश, कैलास मानसरोवर, गंगोत्री, हरिद्वार, यमनोत्री व केदारनाथ यात्रेसाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे 400 भाविक गेल्याचा अंदाज आहे. चौधरी यात्रा कंपनीतर्फे 200 भाविक गेले आहेत. त्यात नगर शहरातील 9 व जिल्ह्यातील 5 असे 14 जण आहेत. र्शीरामपूर, कोपरगाव, र्शीगोंदे व अन्य तालुक्यांतूनही भाविक गेले आहेत. यात्रेकरूंच्या नातेवाइकांना संपर्क साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपतकालीन कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षात 1077 हा टोलफ्री क्रमांक आहे.

बडगे म्हणाले, तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 67 भाविकांची अधिकृत यादी मंगळवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे होती. बुधवार सकाळपासून यादीत वाढ होत आहे. सर्व तालुक्यांचे तहसीलदार त्या-त्या तालुक्यातून गेलेल्या भाविकांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवत आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागात स्वतंत्र 10 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून आतापर्यंत उत्तराखंडामध्ये अडकलेल्या 100 भाविकांशी यात्रा कंपनीच्या माध्यमातून संपर्क झाला असून, हे सर्वजण सुरक्षित असल्याचे समजले आहे. यात्रेसाठी गेलेल्या 242 भाविकांची यादी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवली आहे.

परिस्थितीवर लक्ष
जिल्हा प्रशासनाचा अडकलेल्या भाविकांशी संपर्क सुरू असून जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.