आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातून उत्तराखंडमध्ये गेलेले 331 भाविक सुखरूप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर जिल्ह्यातून विविध ट्रॅव्हल कंपन्यांच्या बस, रेल्वे व वाहनांद्वारे उत्तराखंडमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले 331 भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी गुरुवारी दिली. जिल्हा प्रशासनाने या भाविकांशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे.

उत्तराखंडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देशभरातून तीर्थयात्रेसाठी गेलेले भाविक अडचणीत आले आहेत. विविध ट्रॅव्हल कंपन्या, खासगी व्यक्ती, तहसीलदारांकडून जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातून तीर्थयात्रेसाठी 331 भाविक उत्तराखंडमध्ये गेले आहेत. गुरुवारी त्यांच्याशी संपर्क साधून हे सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. चौधरी यात्रा कंपनीकडून गेलेले 12 भाविक बसद्वारे देहराडूनकडे जात आहेत.

गुरुदत्त ट्रॅव्हलमार्फत गेलेल्या 67 भाविकांना दख्खन येथून हरिद्वारला हलवण्यात येत आहे. चैतन्य ट्रॅव्हल्सद्वारे गेलेले 10 भाविक कुरुक्षेत्र येथे सुरक्षित आहेत. र्शीरामपूरच्या अंबिका ट्रॅव्हल्समार्फत गेलेले 34 भाविक गौरीकुंड येथे सुरक्षित असून त्यांना देहराडून येथे हलवण्यात येत आहे. कोपरगावच्या साई गोरक्षनाथ ट्रॅव्हल्सकडून गेलेले 9 भाविक अयोध्या येथे सुरक्षित आहेत. कोपरगावहून खासगी वाहनाने गेलेले 16 भाविक गुप्तकाशी येथे सुरक्षित आहेत. श्रीगोंद्याच्या नागनाथ ट्रॅव्हल्समार्फत गेलेले 58 भाविक गौरीकुंड येथे सुरक्षित असून त्यांना हेलिकॉप्टरने हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोपरगावच्या साईनाथ यात्रा कंपनीकडून गेलेले 14 भाविक सोनप्रयागपासून पुढील प्रवास करत आहेत. राहुरीहून रेल्वेने गेलेले 10 भाविक मथुरा येथे सुरक्षित आहेत. रेल्वेद्वारा कोपरगावहून गेलेले 15 भाविक उत्तरकाशी येथे सुखरूप आहेत.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथून साईलिला ट्रॅव्हल्समार्फत गेलेले 41 भाविक सोनप्रयाग येथे मंगलकार्यालयात सुरक्षित आहेत. कोपरगावहून अनुराधा ट्रॅव्हल्सकडून गेलेले 38 भाविक हरिद्वार येथे सुखरूप आहेत, तर वैयक्तिकपणे गेलेले सहा भाविक हरिद्वार येथे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.