आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Pilgrims Safe Return From Uttrakhand Flood

अन् अश्रूंचा बांध कोसळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तीर्थयात्रेसाठी केदारनाथला गेलेले सिव्हिल हडकोतील रहिवासी दिलीप देवळालीकर (63) व त्यांची पत्नी लता (57) रविवारी सुखरूप घरी परतले. मनमाड येथे रेल्वेतून आई-वडिलांना उतरताना पाहताच मुलांना अश्रू अनावर झाले. मुलांना पाहून आई-वडिलांनाही रडू कोसळले.

मागील पाच दिवसांपासून आई-वडिलांशी संपर्क न झाल्याने देवळालीकर यांची दोन मुले ऋषिकेश व धनंजय व्याकूळ झाली होती. वृत्तवाहिन्यांवर उत्तराखंडमधील प्रलयाच्या बातम्या पाहिल्या की ते अस्वस्थ होत. किमान 100 ते 200 वेळा त्यांनी मोबाइलवरून आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होत नव्हता. उत्तराखंड येथील संपर्कासाठी दिलेले दूरध्वनी त्यांनी अनेकदा लावले. मात्र, हे क्रमांक सतत बिझी असायचे.

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ऋषिकेशच्या मोबाइलवर फोन आला. त्याचे वडील दिलीप देवळालीकरच बोलत होते. आम्ही सुखरूप आहोत, असे त्यांनी सांगितले आणि लगेच फोन बंद झाला. मात्र, फोन आल्याने दोन्ही भावडांनी नि:श्वास टाकला.

देवळालीकर दांपत्य 7 जूनला नाशिक येथून चौधरी यात्रा कंपनीतर्फे उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात असलेल्या उत्तर काशी, हरिद्वार, बद्रिनाथ, रुद्रप्रयाग, भागिरथी, कैलास मानसरोवर, यमुनोत्री व केदारनाथ या तीर्थयात्रेसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत नगरचे 12 भाविक गेले होते. कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदे, संगमनेर व पाथर्डी या तालुक्यातील 349 भाविक यात्रेसाठी गेले होते. गेल्या सोमवारी उत्तराखंडमध्ये ढगफुटी व पावसाच्या थैमानामुळे हे भाविक अडकले होते. भाविकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने लष्कराला पाचारण केले.अनेकांचे प्राण वाचवण्यात लष्कराला यश आले.

नगर जिल्ह्यातून गेलेले भाविक आता परतीच्या वाटेवर आहेत. कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथून बालाजी ट्रॅव्हल्सने केदारनाथला गेलेले भाविक शनिवारी रात्री घरी पोहोचले. दिलीप व लता देवळालीकर रविवारी दुपारी घरी आल्यानंतर मुले, बहीण, मेहुणे व भाचीच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. बहीण सुनंदा महाले यांनी आपला भाऊ व वहिनीला पेढे भरवले. भाची पौर्णिमाने मामा-मामींना ओवाळले.