आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई कुराश स्पर्धेत नगरला दोन पदके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तैवान देशातील तैपाई येथे १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या कनिष्ठ कॅडेट आशियाई कुराश कुस्ती स्पर्धेत नगर जिल्ह्याला दोन पदके मिळाली. आदित्य धोपावकर याने ७१ किलोखालील वजन गटात रौप्यपदक, तर ज्युनिअर ८१ किलो वजनगटात गणेश लांडगे याने कांस्यपदक मिळवले, अशी माहिती जिल्हा कुराश असोसिएशनचे उपाध्यक्ष मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

धोपावकर म्हणाले, कुराश या खेळाची सुरुवात नगरमधून झाली. आता हा खेळ महाराष्ट्रभर वाढला आहे. या खेळात नगरच्या तीन खेळाडूंनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. २०१८ मध्ये जाकार्ता येथे होणाऱ्या एशियन्स गेम्समध्ये कुराशचा समावेश झाला असून, मुलांचे आठ गट मुलीचे सात गट खेळवण्यास या स्पर्धेत मान्यता देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बाहेर देशातील प्रशिक्षक आणून खेळांडूना प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या खेळाच्या वाढीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत ४७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही कुराशचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय खेळात समावेश झाल्यामुळे खेळांडूना नोकरीमध्ये आरक्षण मिळेल. कुराश असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित जगताप म्हणाले, कुराश हा खेळ महाराष्ट्रातील प्रत्येक गावांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा कुराश असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव या वेळी उपस्थित होते.