नगर - सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात स्वत:ला "अपडेट' करत नगरचे पोलिसही आता "स्मार्ट' होणार आहेत. अहमदनगर पोलिसांचे स्वतंत्र संकेतस्थळ व "
फेसबुक पेज' लवकरच तयार होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा सुरू होत आहे. पोलिस अधीक्षक लखमी गौतम व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या संकेतस्थळावर नगरची तुटपुंजी माहिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर काही जिल्ह्यांत पोलिसांची स्वतंत्र संकेतस्थळे व फेसबुक पेजेस आहेत. त्याच धर्तीवर आता नगरमध्येही पोलिसांचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू होत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत हे संकेतस्थळ सुरू होईल. पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी या संकेतस्थळाचा व फेसबुक पेजचा उपयोग होईल, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.
सोशल नेटवर्किंग मीडिया पाठोपाठ
मोबाइल अॅप्सची लोकप्रियता वाढते आहे. त्यात "व्हॉट्स अॅप'सारख्या अॅप्लिकेशनची जोरात चलती आहे. कम्युनिकेशनचे माध्यम असलेल्या या अॅपच्या माध्यमातून काही आक्षेपार्ह गोष्टीही शेअर होतात. त्यातून काही प्रकरणे थेट पोलिसात गेली आहेत. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता पोलिसच स्मार्ट होणार आहेत. आक्षेपार्ह शेअरिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून व्हॉट्स अॅप कम्युनिकेशनवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
व्हॉटस् अॅपवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक सक्षम अधिकारी नेमला जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व्हॉटस् अॅपवर ५०-५० जणांचे ग्रूप केले
जातील. पत्रकार व शांतता समितीच्या सदस्यांचाही यात सहभाग असेल. याद्वारे व्हॉटस् अॅपवरून पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय संकेतस्थळ व फेसबुक पेजच्या माध्यमातून पोलिसांनी केलेल्या कारवाया, तसेच चांगल्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.