आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पोलिस दलातील शिपाई ते सहायक फौजदार पोलिसांच्या बदल्यांचा "लखमी गौतम पॅटर्न'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा पोलिस दलातील शिपाई ते सहायक फौजदार श्रेणीतील एकूण ४७२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती बदल्यांचे "गॅझेट' शुक्रवारी दुपारी निघाले. बदल्या करताना पारदर्शकता ठेवून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आजवरचा इतिहास लक्षात घेता पोलिसांच्या बदल्या हा वादग्रस्त विषय ठरतो. त्यामुळेच यावेळचा "लखमी पॅटर्न' कितपत यशस्वी ठरतो, हे लवकरच स्पष्ट होईल. पाच वर्षे एकाच पोलिस ठाण्यात, तर दहा वर्षे एकाच तालुक्यात सेवेत असलेल्या पोलिसांच्या प्रशासकीय विनंती बदल्या झाल्या आहेत. अधीक्षक गौतम, अतिरिक्त अधीक्षक शैलेश बलकवडे, गृह विभागाचे उपअधीक्षक शहाजी नरसुडे यांनी बदल्यांचे गॅझेट काढले.
प्रशासकीय बदल्यांमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. विनंती बदल्यांमध्ये सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समतोल साधला आहे, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
गुन्हे आढावा बैठकांमधून लक्षात आलेल्या बाबींवर बदल्यांच्या माध्यमातून तोडगा काढला आहे. नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड पोलिस ठाण्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. या पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तेथे अतिरिक्त तपासी अधिकारी दिले आहेत. या तुलनेत कामाचा अतिरिक्त ताण नसलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ कमी ठेवले आहे. "संलग्न' या गोंडस नावाखाली शहरात ठाण मांडलेल्या ४५ पोलिसांना बदलीच्या ठिकाणी रवाना होण्याच्या सूचना केल्या आहेत.
कुटुंबाला वेळ देता यावा, मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये, बदलीच्या ठिकाणी कुटुंबासह राहता यावे या मुद्यांसह वैद्यकीय घरगुती अडचणींचा बारकाईने विचार केला आहे. महिला पोलिसांची फरफट होऊ नये, याचीही काळजी घेतली आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये निवासस्थान असलेल्या नजीकच्या तालुक्यातच बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी २१ एप्रिलचा "अल्टीमेटम' दिला आहे. गॅझेटनंतर रुजू होण्याच्या प्रक्रियेचा "काटेकोर' आढावा घेतला जाणार आहे.
शिर्डीच्या सुरक्षेसाठी प्लॅन
आगामी कुंभमेळा भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शिर्डीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. बॅरिकेडस्, रेनकोट, क्रेन, जनरेटर, टॉर्च, रोप, फायबर स्टीक्स, बाँबशोधक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह इतर साहित्य घेण्यासाठी पोलिस दलाचा १० कोटींचा प्रस्ताव तयार होता. त्यापैकी २.६० कोटी रुपयांचे साहित्य खरेदी करण्यास तत्काळ मंजुरी मिळाली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री बाँबशोधक टीम मिळावी, असा प्रस्तावही वरिष्ठांकडे पाठवला आहे, अशी माहितीही पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी दिली.
"क्रीम' पोलिस ठाण्यांमध्ये बदल
कोतवाली,तोफखाना ही दोन "क्रीम' (कमाईची) पोलिस ठाणी समजली जातात. त्यामुळे येथे बदलीसाठी अनेक इच्छुक असतात. तर येथून बदलून जाण्यास फारसे पोलिस तयार नसतात. यामागचे नेमके कारण लक्षात आल्यावर "लखमी पॅटर्न'नुसार आमूलाग्र बदल केले आहेत. कोतवालीतील ४२, तर तोफखान्यातील ३२ पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदलामुळे जिल्हा पोलिस दलात चांगला संदेश पोहचवण्याचा वरिष्ठांचा हेतू स्पष्ट आहे.
पारदर्शक समान न्याय
^बदली प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. सर्वांचे म्हणणे ऐकूनच विनंती बदल्या केल्या आहेत. तरीही एखाद्याची गंभीर अडचण असेल, तर तीही ऐकून घेतली जाईल. पोलिसांनी नियुक्तीच्या ठिकाणी समाधानाने मनापासून काम करावे, हा मुख्य उद्देश आहे. पोलिसांच्या बदलीकरिता वशिल्याचे फोन आले नाहीत. पारदर्शकपणा सर्वांना समान न्याय या सूत्रानुसार ही बदली प्रक्रिया राबवली आहे.'' लखमीगौतम, पोलिस अधीक्षक
कोतवाली तोफखाना पोलिस ठाण्यात काही ठरावीक कर्मचारी २०-२५ वर्षांपासून ठाण मांडून आहेत. यापैकी काही पोलिसांच्या बदल्याच झाल्या नव्हत्या. तर वरिष्ठ अधिकारी सोडत नसल्याचे कारण दाखवून काही पोलिस ढिम्म हलत नव्हते. अशा पोलिसांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या कामाची चुणूक अनुभव इतरत्रही दिसावा, याकरिता काही जणांची अकोले, राहात्यासारख्या तालुक्यात बदली केली आहे. आता हे पोलिस बदलीच्या ठिकाणी रुजू होतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
"बदली गॅझेट'चा फेरआढावा घेणार
प्रशासकीय बदली झाल्यानंतर काही पोलिस बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत, तसेच "सोयी'च्या कारणांमुळे वरिष्ठ अधिकारीही अशा पोलिसांना सोडत नाहीत. शिवाय बदलीचे गॅझेट निघाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी पुन्हा आढावा घेत नाहीत. त्यामुळे काही पोलिस एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे सेवा करतात. यापुढे मात्र गॅझेटचा आढावा घेऊन बदली झालेले कर्मचारी रुजू झाले अथवा नाही, याची काटेकोर शहानिशा होणार आहे. वैद्यकीय रजेचे "गोंडस' कारण दाखवणारेही आता कारवाईला पात्र ठरणार आहेत.