आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राठोडांना आता फुटीचा फायदा नाही - दादा कळमकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आतापर्यंत नगर शहर मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीचा फायदा शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांना मिळाला. पण आता तसे होणे शक्य नाही. महापौर संग्राम जगताप हे सक्षम उमेदवार आहेत. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल, असे गृहीत धरून आम्ही कामाला लागलो आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीची बैठक रविवारी हॉटेल सिंग रेसिडेन्सीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी चर्चा झाली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव का होतो, याचे चिंतन करण्यात आले. या वेळी आमदार अरुण जगताप, कळमकर, महापौर संग्राम जगताप, शंकरराव घुले, डॉ. रावसाहेब अनभुले आदी उपस्थित होते.

कळमकर म्हणाले, 1990 पासून आमच्यात अंतर्गत मतभेद असल्याने त्याचा फायदा राठोड यांना होत असे. पण आता आम्ही तसे होऊ देणार नाही. आघाडी करून निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या पक्षाचा उमेदवार सक्षम आहे, त्याच पक्षातील उमेदवाराला तिकीट दिले जाईल.

महापौर जगताप हे सक्षम उमेदवार असून वरिष्ठ पातळीवर निर्णय होईपर्यंत आम्ही त्यांची उमेदवारी गृहीत धरली आहे. जगताप यांनी विविध विकासकामे मार्गी लावली. शहरातील नेटवर्क चांगले असून आम्हाला त्याचा फायदा होइल. काँग्रेसकडून कोणतीही नाराजी नसेल. ते आम्हालाच मदत करतील, असा विश्वासही कळमकर यांनी व्यक्त केला.