आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटसृष्टीतील सोनेरी पानांचे नगरकरांवर गारूड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जगभरातील चित्रपट रसिकांवर मोहिनी घालणारे व विविध भाषा आणि देशांची संस्कृती दर्शवणार्‍या चित्रपटांनी नगरकरांवरही गारूड टाकले. शहरातील न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित ‘प्रतिबिंब’ राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवामुळे नगरकरांना दुर्मिळ चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. महोत्सवात रविवारी दाखवलेल्या ‘द कप’, ‘पथेर पांचाली’, ‘बोल’ व ‘ओसामा’ या चित्रपटांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला.

यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात सुरू असलेल्या या महोत्सवाची सुरुवात ‘पोस्टमन इन द माउंटन’ (चीन) या ह्यओ जियांकीच्या चित्रपटाने झाली. त्यानंतर श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भूमिका’, अमेरिकेतील जेम्स कॉन्क्लेव्ह दिग्दर्शित ‘टू सर विथ लव्ह’, के. स्टेलिन दिग्दर्शित ‘इंडिया अनटच’ हा माहितीपट दाखवण्यात आले. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी खेंनसे नॉरबू दिग्दर्शित ‘द कप’ हा भूतानचा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’ व शोएब मन्सूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘बोल’ हा पाकिस्तानचा चित्रपट दाखवण्यात आला. दुपारच्या सत्रात अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपट, तर रात्री सिद्धिक बॅरमॅक यांनी दिग्दर्शित केलेला ‘ओसामा’ हा अफगाणिस्तानमध्ये तयार झालेला चित्रपट दाखवण्यात आला. सोमवारी गाजलेले लघुपट व माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. दुपारच्या सत्रात देशभरातील लघुपट व माहितीपटांची स्पर्धा होईल. सायंकाळी 6 वाजता चित्रपट अभ्यासक गायत्री चटर्जी व पटकथा लेखक शैलेश दुपारे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण होणार आहे. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे यांच्यासह प्राचार्य डॉ. भास्कर झावरे उपस्थित राहतील.

समाजातील वास्तवाचे भान
मुंबई-पुण्यात जाऊन महोत्सव पाहणे अनेकांना परवडत नाही. या महोत्सवामुळे ती अडचण दूर झाली. समाजातील वास्तवाचे भान यावे असे वाटत असेल, तर तरुणाईने हे सिनेमे पाहायलाच हवेत. असे चित्रपट पालकांनी मुलांना आणि मुलांनी पालकांना दाखवले पाहिजेत. त्यामुळे नक्कीच जबाबदार पिढी तयार होईल.- मदन भळगट, सोनई

‘द कप’ भावला
पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्येच असे चित्रपट महोत्सव आयोजित होतो. शिवाय जे चित्रपट अशा महोत्सवांत दाखवले जातात, ते नगरच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत नाहीत. ‘प्रतिबिंब’च्या निमित्ताने दुर्मिळ चित्रपटांची पर्वणीच मिळाली. लहान मुलांचे भावविश्व चितारणारा ‘द कप’ हा सिनेमा खूप आवडला.’’ प्रा. कांत सोनटक्के, नगर

अंतर्मुख करणारे चित्रपट
‘प्रतिबिंब’च्या माध्यमातून दुर्मिळ चित्रपटांचा खजिनाच नगरकरांसाठी खुला झाला, पण म्हणावी तशी गर्दी नव्हती. एकूणच नगरकरांना त्याची फारशी जाणीव नसल्याचा खेद वाटतो. महोत्सवात दाखवलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटांमुळे अंतर्मुख झाले.
ऋचा ठाकूर, कवयित्री