आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरी कलाकाराचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील प्रसिद्ध शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी त्यांना गौरवणार आहेत. बालाजी तांबे फाउंडेशनच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील "आत्मसंतुलन व्हिलेज कार्ला' येथील "स्काय सेंटर ऑडिटोरियम'मध्ये हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.

बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. माहिती, ज्ञान आणि नवनिर्मितीच्या माध्यमाद्वारे लोकप्रबोधन करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव या सोहळ्यात होणार आहे. डॉ. बालाजी तांबे यांनी असा सोहळा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विशेष गौरव समारंभाने "नमो भारतम' "बालाजी तांबे फाउंडेशन'च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

"आपला गणपती आपणच बनवा' या संकल्पनेद्वारे राज्यातील हजारो कलारसिकांना शाडूमातीपासून गणपती बनवण्याचे धडे कांबळे यांनी दिले. पर्यावरण रक्षणाचा संदेशही त्यांनी याद्वारे दिला. नगरमधील महावीर कलादालनात साकारलेल्या "सारे जहाँसे अच्छा' या ९० बाय २० फूट आकारातील जगातील सर्वात मोठ्या पेन्सिल चित्राद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला. विविध महापुरुष, संत, महंतांची शिल्पे साकारुन समता बंधुभावाचा संदेश त्यांनी दिला.
शिर्डीमध्ये त्यांनी साकारलेली ५२ फूट उंचीची फायबरमधील मूर्ती चर्चेचा विषय ठरली.
मुंबईतील "काला घोडा फेस्टिव्हल'मधील त्यांचा प्राणीशिल्पांचा देखावा जगभर गाजला. चित्रकूटमध्ये साकारलेल्या "नन्ही दुनिया' या प्रकल्पातील प्राणीशिल्पाच्या निर्मितीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांचा गौरव केला होता. यावेळी त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव होत आहे. सकाळी साडेदहा वाजता हा सन्मान सोहळा सुरु होईल.

वडिलांकडून मिळाले कलेचे बाळकडू

प्रमोद कांबळे यांनी सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टस््मधून १९८४ मध्ये जी. डी. आर्टस््चे प्रशिक्षण घेतले. वडील दत्तात्रेय कांबळे यांच्याकडून त्यांना चित्रकलेचे शिल्पकलेचे बाळकडू मिळाले. सुमारे तीन दशके ते चित्र शिल्पकला क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. तीस वर्षांच्या कला कारकिर्दीत त्यांनी विविध पत्रिकांचे कलात्मक डिझाईन, वर्तमानपत्रांतील जाहिरातींचे डिझाईन, वॉलपेंटिंग्ज, साईन पेंटिंग्ज, गणपती नवरात्रामधील देखावे, तसेच चित्रपटसृष्टीत कला सहायक म्हणूनही कामे केली.