आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांना हवी थेट पुणे रेल्वे !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर-पुणे लोहमार्ग कधी होणार? नगरहून पुण्याला दररोज ये-जा करणा-या हजारो विद्यार्थ्यांना आणि कामक-यांना पडलेला हा प्रश्न केंद्र सरकार किंवा रेल्वे प्रशासनाच्या कानावर कधीच गेलेला नाही. त्यामुळे त्यांना दररोज जास्त वेळ, पैसा आणि परिश्रम खर्च करून रस्ते मार्गाने खस्ता खात पुणे गाठावे लागत आहे. नगर - बीड - परळी या त्यांच्यासाठी निरूपयोगी असलेल्या रेल्वेमार्गाचे काम सुरू झालेले असले तरी नगरहून थेट पुण्याला रेल्वे सुरू होत नाही तोवर नगरचा सर्वांगीण विकास अशक्य आहे. तथापि, कोणतेही विकासकार्य जनरेट्याविना मार्गी लागत नाही. ‘दिव्य मराठी’ने नगरच्या विकासाचा हा प्रश्न धसास लावण्यासाठी नगरच्या सर्वसामान्यांपासून राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणण्याचा निर्धार केला आहे. चला, या ऐतिहासिक शहराच्या विकासासाठी नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी जनमत संघटित करू!
नगरहून बीडमार्गे परळीला जाणा-या रेल्वेमार्गाची नेहमी चर्चा होते. यातील पहिल्या म्हणजे नगर-नारायणडोहोदरम्यानच्या टप्प्याची लवकरच चाचणी होणार आहे. 2005 मध्ये कामास सुरुवात झालेल्या या 246 कि.मी. मार्गाची आता नगरकरांच्या दृष्टीने उपयुक्तता राहिलेली नाही. याउलट नगरहून पुण्याला दिवसाला पाच हजारांहून अधिक लोक ये-जा करीत असताना नगर-पुणे थेट रेल्वेमार्गाबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. दररोज बसमध्ये धक्के खात, वाहतुकीच्या कोंडीचा मन:स्ताप सहन करीत, जादा वेळ व पैसे खर्च करून नगरकरांचे पुणे ‘अप-डाऊन’ सुरू आहे. नगर-पुणे असा शिरूरमार्गे थेट रेल्वेमार्ग झाल्यास नगरकरांची सोय तर होईलच, पण नगरच्या विकासास नवा आयाम मिळेल. नगरमधील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. नवा रेल्वेमार्ग झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील आणि आपल्या घरी राहूनच शिक्षणासाठी ये-जा करू शकतील. थेट रेल्वेमार्गाअभावी नगरमधील प्रवाशांच्या वेळ व खिशाला चाट बसत आहे. हा त्रास वाचविण्यासाठी थेट रेल्वे हाच एक पर्याय आहे.
रखडलेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग - सध्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे परळीच्या बाजूने व नगरच्या बाजूने काम सुरू असल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आला. या मार्गातील पहिल्या, म्हणजे नगर-नारायणडोहो टप्प्याची लवकरच चाचणी होणार आहे, पण तो पूर्ण होण्यास अजून तीन ते चार वर्षे लागतील असे जाणकार सांगतात. या मार्गाचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. 257 किलोमीटर अंतराच्या या मार्गाचा सुरुवातीला खर्च 120 कोटी गृहीत धरण्यात आला होता. आता तो 750 कोटींवर पोहोचला आहे. काम पूर्ण होईल तेव्हा तो कदाचित 1500 कोटींपर्यंत जाऊ शकतो. मराठवाड्याच्या दृष्टीने हा मार्ग लवकर होणे महत्त्वाचे होते. सुरुवातीला भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी या प्रश्नात लक्ष घातले होते, पण प्रश्नाचा पाठपुरावा न झाल्याने रेल्वे प्रशासनही निवांत झाले आहे. दरम्यान, जनरेटाही कमी पडल्याने हा रेल्वेमार्ग सुरू होईल, यावर कोणाचाही विश्वास नाही. त्यापेक्षा नगर-शिरूर-पुणे असा रेल्वेमार्ग लवकर झाला, तर तो रेल्वे व प्रवासी अशा दोघांच्याही दृष्टीने फायद्याचा ठरेल. मराठवाड्यातील प्रवासीही नगरपर्यंत बसने येऊन येथून रेल्वेने लवकर पुण्याला जाऊ शकतील.
नगर-पुणे प्रवासाची स्थिती - नगरहून दररोज एसटीच्या सुमारे 600 बस पुण्याला जातात. त्यातील 180 बस फक्त नगर-पुणेदरम्यानच्या आहेत. याशिवाय दिवसभरात शंभराहून अधिक खासगी ट्रॅव्हल व जीप नगर-पुणे प्रवासी वाहतूक करीत असतात. शनिवारी, रविवारी व सोमवारी बसमध्ये
बसण्यासही जागा मिळत नाही, अशी माहिती स्वस्तिक स्थानकावरील एस.टी.चे वाहतूक नियंत्रक बी. एच. विधाते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
नगर-दौंड-पुणे : वेळ व पैशांचा अपव्यय - नगर-पुणे या 120 किलोमीटर अंतरासाठी बसने तीन तास लागतात. या चौपदरी महामार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा मार्गही कमी पडणार आहे. त्यात पुण्यातील शेवटच्या वीस किलोमीटरच्या टप्प्याला तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. दौंड रेल्वेमार्गाने हेच अंतर 160 किलोमीटर होते. त्यासाठी लागणारा वेळ किमान चार तास आहे. रेल्वे प्रशासनाने यासाठी अधिकृतपणे तीन तासांचा वेळ गृहीत धरला आहे. ते कधीच शक्य होत नाही, कारण गाडी दौंडला गेल्यानंतर तेथे किमान अर्धा तास वाया जातो. तेथे एका टोकाचे इंजिन काढून ते दुस-या टोकाला लागते. हे अंतर कमी होणे शक्य नाही. त्यामुळे नगरकर रेल्वेने पुण्याला जाणे टाळतात.
नगर-शिरूर-पुणे मार्गाचा पर्याय - नगर-पुणे दरम्यान रांजणगाव, सुपा, नगर व पुढे नेवासे तालुक्यातील पांढरीपूल परिसरातील एमआयडीसीचा विचार करून नगर-शिरूर-पुणे असा रेल्वेमार्ग उभारण्याची मागणी पुढे आली. सध्या रांजणगाव एमआयडीसीत रोज कामास जाणा-या नगरकरांची संख्या मोठी आहे. याशिवाय पुण्यात राहणे परवडत नाही, म्हणून अनेकजण शिरूरला राहून पुण्याला ये-जा करतात. काहीजण रांजणगावला राहतात. नगर-पुणे असा जवळचा रेल्वेमार्ग झाल्यास हे अंतर जेमतेम दीड तासांचे होऊन वेळ व पैसा वाचू शकेल.
नगर-बेलवंडी-पुणे - सध्याच्या नगर-दौंड-पुणे मार्गावरील बेलवंडीपर्यंत 45 किमीचा रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. तेथून थेट पुण्यापर्यंत 60 किमी रेल्वेमार्ग तयार केला तर नगर-पुण्याचे अंतर 105 किलोमीटर होईल. ते अवघ्या दीड तासात पार करता येईल. फक्त या मार्गाने शिरूर किंवा रांजणगावला उपयोग होणार नाही. शिवाय, या मार्गात घोड व भीमा या दोन नद्या येत असल्याने या मार्गाचा खर्च प्रचंड असेल, अशी माहिती रेल्वे अधिका-यांनी दिली.
रेल्वेची कार्यपद्धती - नव्या रेल्वेमार्गवर पहिल्याच दिवशी किमान खर्चाच्या 16 टक्के परताव्याची अपेक्षा रेल्वे प्रशासन करते. त्यामुळे नवीन मार्ग सुरू करायचा असला की, अधिकारी सर्वांत आधी 16 टक्के परतावा मिळणार नाही, असा निष्कर्ष काढून योजना हाणून पाडतात. नगर-कल्याण मार्गाबाबत अशीच चलाखी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अडचणी - सध्या पुण्याशी जोडणा-या नव्या रेल्वेमार्गाबाबत एक प्रमुख अडचण आहे, ती पुणे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मची. पुण्यात फक्त सहाच प्लॅटफॉर्म असून गाड्यांची संख्या मोठी असल्याने गाड्यांना लवकर स्टेशनमध्ये जाता येत नाही. त्यामुळे त्यांना उशीर होतो.
आपली मते या मोबाइल नंबरवर कळवा - 9764822122, 9881337775