आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-पुणे रेल्वेसाठी नगरकर संघटित होणार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘नगरकरांना हवी थेट पुणे रेल्वे!’ हे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच नगरकरांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत करून ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार व्यक्त केला. ही थेट रेल्वेसेवा सुरू झाली, तर नगरचा चेहरा-मोहराच बदलून जाईल अशा प्रतिक्रिया नगरकरांनी व्यक्त केल्या. या विषयाला जनतेचा रेटा मिळावा, यासाठी काही नगरकरांनी पुढाकार घेऊन रविवारी, 22 रोजी बैठक बोलावली आहे. त्यात नगर-पुणे रेल्वे कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात यांनी गेल्या वर्षीच या मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले. नगर-सुपे-राळेगणसिद्धी- रांजणगाव-वाघोली अशा मार्गाची मागणी त्यात आहे. यासाठी जमिनी उपलब्ध आहेत. दहा वर्षांनी तेही शक्य होणार नाही. रेल्वेमार्गामुळे नगरचा झपाट्याने विकास तर होईलच, शिवाय रस्ते वाहतुकीचा ताणही कमी होईल, असे त्यांनी नमूद केले. थोरात यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात येऊन हा प्रश्न आक्रमकतेने मांडल्याबद्दल धन्यवाद दिले.
मंजुरी मिळेल - दोन वर्षांपूर्वी या मार्गासाठी प्रस्ताव दिला. आगामी अंदाजपत्रकात मंजुरी मिळून सर्व्हेसाठी तरतूद शक्य आहे. या मार्गामुळे वेळ व पैसा वाचेल. स्थानिक रोजगार वाढेल. अप्रत्यक्ष फायदेही होतील. श्रीगोंद्याच्या पुढे पुणे जोडले, तर 30 ते 40 किलोमीटरचाच खर्च करावा लागेल. कामाला वेळही कमी लागेल. - दिलीप गांधी, खासदार.
फूल,फळ उत्पादकांना फायदा - उद्योजकांसोबतच फूल व फळ उत्पादक शेतक-यांना फायदा होईल. जिल्ह्यात कार्नेशन फुले, केळी, पेरू, डाळिंब उत्पादन वाढले आहे. मुख्य बाजारपेठ पुण्याची आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत मागे एकदा हा मुद्दा चर्चेला आला होता, पण नंतर काही झाले नाही. आता प्रस्तावाला पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न करू. - अनंत देसाई, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते.
प्रत्येकाचा फायदा - दोन शहरांतील अंतर कमी होऊन व्यापारउदीम वाढण्यास मदत होईल. पुण्यातील काही मंडळी राहण्यासाठी नगरला येण्याचा विचार करतील. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला फायदा होईल. आमदार या नात्याने या योजनेला माझा पाठिंबा आहे. - दीपक तलरेजा, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते
वाहतूक कोंडीतून सुटका - नगर-पुणे रस्ता मार्गावर चंदननगरपासून वाहतूक कोंडी वाढते. पुढे जाण्यास तास लागतो. बसच्या तुलनेत हा प्रवास स्वस्त असल्याने अप-डाऊन करणेही शक्य होईल. सुपे, रांजणगाव एमआयडीसीत नगरच्या तरुणांना नोक-या करता येतील.
लोकप्रतिनिधी उदासीन - अनेक निवेदने दिली, शिष्टमंडळे नेली, आंदोलने झाली; पण लोकप्रतिनिधींना गांभीर्य कळलेले नाही. नगर-कल्याण रेल्वे झाली, तर मुंबई ते विशाखापट्टणम असा थेट मार्ग तयार होईल. पुढील 50 वर्षांचा विचार करता नगर-कल्याण, नगर-पुणे मार्ग होणे आवश्यक आहे. - दिनेशचंद्र हुलावळे, माळशेज रेल्वे कृती समिती
दहा वर्षांपासून पाठपुरावा - नगर-पुणे व मुंबई गाडीसाठी 10 वर्षांपूर्वी प्रयत्न केले. सोलापूर, सिकंदराबाद, मुंबईतील अधिका-यांसमोर म्हणणे मांडले, आंदोलने केली. मुंबईसाठी गाडी सुरू झाली. गाडी रात्री 10 वाजता सोडावी आणि गाडीला दोन डबे जोडावेत अशी मागणी आहे. - सुधीर मेहतो, माजी सदस्य, रेल्वे सल्लागार
आणखी 10 वर्षे प्रतीक्षा - रेल्वे अधिका-यांची मानसिकता लक्षात घेता 10 वर्षे तरी मार्ग होणे अवघड आहे. समितीच्या बैठकीत आम्ही प्रस्ताव मांडतो, पण देशपातळीवरचा निर्णय असल्याचे सांगून अधिकारी तो टाळतात. या मार्गाचा फायदा नगरला होणार आहेच. - हरजिससिंह वधवा, माजी सदस्य, रेल्वे सल्लागार
रोजगाराच्या संधी - नगर-बीड रेल्वेमार्गापेक्षा हा मार्ग आवश्यक आहे. पुणे, औरंगाबाद व नाशिक रेल्वेने नगरशी जोडल्यास नवे रोजगार मिळतील. पुण्या-मुंबईत कारखाने व घरे बांधण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने तेथील उद्योजक व नोकरदारही नगरला प्राधान्य देतील. - धनेश बोगावत, हॉटेल व्यावसायिक
विकासातील धोंड - नगर-परळी मार्ग पूर्वी जामखेडमधून जाणार होता. नगररचना विभागाने नकाशा तयार करून आरक्षणही टाकले. नंतर मार्ग बदलून आष्टीहून नेण्याचे ठरले. आता रेल्वे तर येणार नाही, पण त्यासाठी टाकलेले आरक्षण ही विकासातील मोठी धोंड ठरली आहे. - जयप्रकाश देशपांडे, निवृत्त अति. विक्रीकर आयुक्त
शटल सेवा आवश्यक - पुण्यासाठी पाच-पाच मिनिटांनी बस असल्या तरी गर्दी हटत नाही. काही वर्षांत रस्ता वाहतुकीवर ताण येणार असल्याने नगर-पुणे रेल्वे करून बारामतीसारखी शटल सेवा सुरू व्हावी. तसे झाल्यास एका दिवसात मुंबईला जाऊन परत येणे शक्य होईल. - रमेशचंद्र बाफना, माजी सदस्य, रेल्वे सल्लागार