आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुजोर अधिकार्‍यामुळे वातावरण तापले; फाइलीवर स्वाक्षरी करण्यास अभियंते पालवेंची टाळाटाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेचे 71 वर्षांचे ज्येष्ठ सदस्य तुकाराम शेंडे यांना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप पालवे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. हे प्रकरण चांगलेच चिघळले असून सोमवारी (23 जून) होणार्‍या सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटणार आहेत. पालवे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
माळी चिंचोरा ग्रामपंचायतीच्या रस्त्याच्या बिलासंदर्भात शुक्रवारी (20 जून) शेंडे जिल्हा परिषदेत गेले होते. त्यावेळी पालवे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली.

शेंडे म्हणाले, बांधकाम विभागातील एका शिपायाने पालवे मिटिंगमध्ये असल्याचे सांगून मला बाहेरच थांबवले. पंधरा मिनिटांनी आतमध्ये गेल्यानंतर पालवे एका ठेकेदाराशी गप्पा मारत असल्याचे दिसले. पालवे माझ्याकडे दुर्लक्ष करून समोर बसलेल्या दुसर्‍या व्यक्तीशी बोलत होते. सरपंचाने रस्त्याच्या कामाचे बिल दिले आहे, ते पास करून द्यावे अशी सूचना मी केली. त्यावर पालवे यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन बिल पास करण्यासाठी मला काम पहावे लागेल, असे सांगितले.

अर्धा तास थांबल्यानंतर दोन ठेकेदार कामाची बिले घेऊन आले. त्यांना सोमवारी (23 जून) सर्वसाधारण सभेच्या दिवशी येण्याचा सल्ला देत तुम्ही बिल घेण्यासाठी कशासाठी आला, असा सवाल पालवे यांनी केला. याच मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. आम्ही जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ सदस्याचा अपमान हा जनतेचा अपमान आहे. सरपंच, तसेच माझ्याकडून पैसे घेतल्याशिवाय बिले पास केली नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना फोन करून प्रकार सांगितला. त्यानंतर पालवे यांनी रागाने फाइलवर स्वाक्षरी केली, अशी हकिकत शेंडे यांनी सांगितली.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेचे सर्वच सदस्य संतापले असून याचा जाब सर्वसाधारण सभेत विचारला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
तातडीने निलंबित करा
अधिकार्‍यांच्या मुजोरीमुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेत लोकशाही नव्हे, तर अधिकाºयांची ठोकशाही सुरू आहे. हा प्रकार सर्वसाधारण सभेत उपस्थित केला जाईल. पालवे यांचे तातडीने निलंबित करून त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव केला जाईल.’’
बाळासाहेब हराळ, सदस्य, जि. प.
दोन टक्क्यांचा घोळ
दोन वर्षांपासून दोन टक्के घेऊन बिल पास केले जाते. यापूर्वी नेवासे येथे पालवे यांना एका उपअभियंत्यासमक्ष दहा हजार रुपये दिले होते, असे सांगून बांधकाम विभागात राजरोसपणे आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचा आरोप तुकाराम शेंडे यांनी निवेदनात केला आहे.
रजेवर पाठवा....
जिल्हा परिषदेच्या सदस्याला अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून गुर्मीत बोलणारे अधिकारी दिलीप पालवे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. ’’
-राजेंद्र फाळके, सदस्य, जि. प.
सर्व आरोप खोटे
आरोप खोटे आहेत. तसा कोणताही प्रकार झालेला नाही. शेंडे आल्यानंतर फाइलीवर तत्परतेने स्वाक्षरी केली. नेवासे येथील भेटीसंदर्भात त्यांनी केलेला आरोपही खोटा आहे. आतापर्यंत सर्वांना सहकार्य केले असून सन्मानाची वागणूक दिली आहे. ’’
-दिलीप पालवे, कार्यकारी अभियंता