आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर रेल्वेस्टेशनला सीसीटीव्हीची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरच्या रेल्वेस्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आठ वर्षांपासून धूळखात पडला आहे. ठिकठिकाणी असे कॅमेरे बसवल्यास स्टेशन परिसरात सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा बसू शकतो. पण तसे करण्याची इच्छाशक्तीच रेल्वेच्या प्रशासनाकडे नाही.

नगरच्या स्टेशनला ‘ए क्लास’ आणि मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळाला आहे. जिल्ह्यात नगर व कोपरगाव स्टेशनला हा दर्जा मिळाला आहे. ज्या स्टेशनला हा दर्जा मिळतो, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असते. पण, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नगरचे स्टेशन प्रबंधक व इतर अधिकार्‍यांनी यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, सोलापूरच्या विभागीय कार्यालयाने त्याकडे डोळेझाक केल्याची माहिती समजली.

‘दिव्य मराठी’ने 30 जुलैच्या अंकात एजंटगिरीचा पर्दाफाश केला होता. तत्काळ आरक्षणासाठी रेल्वे प्रशासनाने नियम कडक केले आहेत. मात्र, एजंटांनी त्यावरही तोडगा काढला आहे. ते आता तिकिटांऐवजी आरक्षण खिडकीवर अनधिकृतरित्या नंबर लावून नंबरचे फॉर्म गरजू प्रवाशांना विकत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या टीमने पहाटे चार वाजता केलेल्या पाहणीत उघड झाले. सध्या गर्दीचा मोसम नसतानाही फॉर्मसाठी प्रत्येकी तीनशे रुपये घेतले जात असल्याची कैफियत मध्यरात्री दोनपासून खिडकीवर नंबर लावलेल्या प्रवाशांनी मांडली. या गैरव्यवहारात बुकिंग करणार्‍या कर्मचार्‍यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. जेथे बुकिंग होते, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर खिडकीवर कोणते लोक नेहमी येतात, हे स्पष्ट होईल. तसेच प्रत्येक गोष्ट कॅमेरे टिपणार असल्याने काळ्याबाजाराला आळा बसू शकतो. रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी रेल्वेच्या विभागीय अधिकार्‍यांकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. रेल्वेस्टेशनचे प्रबंधक ए. यू. पाटीलही स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, विभागीय कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नगरच्या स्टेशनमधील अनेक आवश्यक बाबींकडे विभागीय कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची आवश्यकता

नगर परिसरात आर्र्मड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस), मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी), व्हीआरडीई व सीक्यूएई हे लष्कराचे चार महत्त्वाचे विभाग आहेत. या विभागांची मुख्यालयांमुळे नगर शहर संवेदनशील मानले जाते. सध्या असलेला दहशतवादाचा धोका पाहता स्टेशनवर कॅमेरे बसवल्यास संशयित लोकांवर नजर राहू शकते.