आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण नियम कडक, रेल्वे तिकिटांऐवजी अर्ज विकण्याचा एजंटांचा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तत्काळ आरक्षणासाठी रेल्वे प्रशासनाने नियम कडक केले. मात्र, एजंटांनी त्यावरही तोडगा काढला आहे. ते आता तिकिटाऐवजी आरक्षण खिडकीवर अनधिकृतरीत्या नंबर लावून ते नंबरचे फॉर्मच गरजू प्रवाशांना विकत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या टीमने पहाटे चार वाजता केलेल्या पाहणीत उघड झाले. फॉर्म विकताना त्यावरील प्रत्येक प्रवाशासाठी आता गर्दीचा मोसम नसतानाही प्रत्येकी तीनशे रुपये घेतले जात असल्याची कैफियत रात्री दोन पासून खिडकीवर नंबर लावलेल्या प्रवाशांनी मांडली. एजंटांच्या या ‘धंद्या’त खिडकीवरील कर्मचार्‍यांचीही निम्मी-निम्मी भागीदारी असल्याची महिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली.

रेल्वेचे कन्फर्म आरक्षण मिळवणे, हे प्रवाशांच्या दृष्टीने दिव्य बनले आहे. नगरहून जाणार्‍या दिल्ली, पूर्व भारत व उत्तरेकडे जाणार्‍या सर्व गाड्यांचे आरक्षण ज्या दिवशी सुरू होते (दोन महिने आधी) त्याच दिवशी तासाभरात संपते. सुट्यांच्या काळात तर पहिल्या दहा मिनिटांतच हे आरक्षण संपल्यानंतर प्रवाशांना तत्काळ आरक्षणाशिवाय पर्याय नसतो. तत्काळचे आरक्षण काढण्यासाठीची वेळ सकाळी दहा आहे. मात्र, प्रवाशांना रात्रीपासून रांग लावावी लागते. कारण रांगेतील पहिल्या चार-पाच क्रमांकाच्या प्रवाशांपर्यंत सर्व आरक्षणे संपलेली असतात. एजंटांना चाप लावण्यासाठी रेल्वेने तत्काळ आरक्षण काढण्यासाठी छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची प्रत जोडणे सक्तीचे केले आहे. नगरला स्टेशन परिसरात राहणार्‍या एजंटांनी वेगळाच फंडा शोधला आहे. एजंट आपले सात-आठ फॉर्म आधीच त्यावर अनधिकृतपणे क्रमांक टाकून खिडकीवर ठेवतात. सामान्य प्रवाशांचे क्रमांक त्यानंतर असतात. विशेष म्हणजे रात्रीपासून रांग लावूनही खिडकीजवळ असलेल्या प्रवाशाला रेल्वेचा आरक्षण कर्मचारी तुमचा क्रमांक सहावा किंवा सातवा असल्याचे सांगतो. सर्वात प्रथम येणार्‍या प्रवाशाला हे कळत नाही की, आपल्या पुढे क्रमांक असलेले इतके लोक कधी आले? त्यानंतर मग आधीच्या क्रमांकाचा सौदा सुरू होतो. थोडक्यात, आधी लावलेल्या क्रमांकासाठी आरक्षण किती लोकांचे आहे यावरून किंमत ठरते. एका प्रवाशामागे किमान तीनशे रुपये घेतले जातात. एका फॉर्मवर फक्त एकच प्रवाशाचे नाव असेल, तर किमान दोन प्रवाशांच्या खर्चाची म्हणजे सहाशे रुपये मागणी केली जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

पहाटे चार वाजता ‘दिव्य मराठी’च्या चमूने रेल्वे स्टेशनवर भेट दिली. रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवाही समवेत होते. त्या वेळी तत्काळ आरक्षणासाठी आठ जण रांग लावून उभे होते. त्यापैकी एक अभिषेक शर्मा विद्यार्थी होता. तो रात्री बारापासून स्टेशनवर होता. काशी हुसेन नावाच्या प्रवाशाने तो गेल्या तीन दिवसांपासून तत्काळ आरक्षणासाठी रेल्वेस्टेशनवर येत असल्याचे सांगितले. ‘दिव्य मराठी’च्या छायाचित्रकाराने छायाचित्रे काढल्यावर बाजूला वावरणार्‍या एका एजंटाने बाहेर जाऊन माहिती दिल्याने सर्व एजंट सावध झाले व त्यांनी लगेच पोबारा केला.

त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास पुन्हा स्टेशनवर भेट दिली असता प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. कारण सोमवारी एजंट गायब असल्याने सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळाली.

पदाधिकारी झाले आक्रमक..

गैरप्रकारांबाबत सतत आवाज उठवू
रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना मिळणार्‍या सेवेबाबत अनेक प्रश्न आहेत. याबाबत मी आवाज उठवला होता. आता आरक्षण तसेच प्रवाशांना होणार्‍या गैरसोयींबाबत रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करू. तत्काळ आरक्षणाबाबत अनधिकृत क्रमांक असलेल्या फॉर्मच्या विक्रीचा प्रकार फक्त नगरमध्येच होत आहे. याबाबत कारवाई न झाल्यास रेल्वेच्या सरव्यवस्थापकांसमोर हे प्रश्न नेले जातील.’’ हरजितसिंग वधवा, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

‘दिव्य मराठी’मुळे तिकीट मिळाले
आग्य्राला जाण्यासाठी दीड महिन्यापूर्वी आरक्षण केले. पण ते कन्फर्म झाले नाही. तत्काळ आरक्षणाशिवाय पर्याय नव्हता. तीन दिवसांपासून रोजे असतानाही पहाटेच्या नमाजास न जाता तत्काळ आरक्षणासाठी रेल्वे स्टेशनवर यावे लागले. दोन दिवसांपूर्वी एजंटाने आरक्षण फॉर्म देण्यासाठी पाचशे रुपयांनी मागणी केली होती. सोमवारी ‘दिव्य मराठी’च्या टीमने केलेल्या कारवाईमुळे एजंटांना स्टेशनवर येता आले नाही. त्यामुळे आम्हाला कन्फर्म आरक्षण मिळाले.’’ काशी हुसेन, प्रवासी

रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करणार
आरक्षणासाठी सकाळी गेलो होतो. साडेनऊ ते साडेदहा या काळात सामान्य आरक्षण बंद होते. तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर उद्धट व मोघम उत्तरे मिळाली. याबाबत आता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करू.’’ विनायकराव देशमुख, अध्यक्ष, केंद्र-राज्य योजना संनियंत्रण समिती.

दोषींवर कडक कारवाई करणार
एजंटांच्या विरोधात रेल्वे प्रशासन अनेक उपाययोजना सध्या करत आहे. प्रवाशांची पिळवणूक करणार्‍यांत एजंट किंवा रेल्वेचे जे कर्मचारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. एजंटांचा सुळसुळाट बंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना मी संबंधितांना दिल्या आहेत.’’ ए. एम. हुसेनी, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, सोलापूर विभाग.