आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ण प्लॅटफॉर्म स्वच्छतागृहाविनाच, रेल्वेच्या विचित्र धोरणांचा परिपाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अनारक्षिततिकिटासाठी नगरच्या स्टेशनवर दोन खिडक्यांची व्यवस्था आहे. पण येथील एकच खिडकी सुरू असते. परिणामी गाडी आली, तरी प्रवाशांना तिकीट मिळणे दुरापास्त होते.
नगर - नगरच्या रेल्वे स्टेशनवर फक्त अप्रमाणित खाद्य पदार्थ विक्रेत्यांची समस्या नाही, तर स्वच्छता पिण्याचे पाणी, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर तर स्वच्छतागृहांचाही अभाव आहे.
लष्कराचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या नगरच्या रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांच्या अडचणींकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. एकेकाळी नगरच्या रेल्वेस्टेशनला स्वच्छ स्टेशनचा पुरस्कारही मिळाला आहे. आता परिस्थिती एकदम उलट आहे. अस्वच्छतेमुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवर सायंकाळनंतर डासांचे प्रचंड साम्राज्य असते. दिवसा डासांची जागा माशा घेतात. पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत, पण नळांच्या खाली असलेले बेसिन अत्यंत अस्वच्छ आहेत.

स्वच्छतागृहे कुलूपबंद
प्लॅटफॉर्मक्रमांक दोनवर असलेली स्वच्छतागृहे अनेक वर्षांपासून बांधलेली आहेत. मात्र, त्यांना कुलूप आहे. त्यामुळे प्रवासी, विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होते. महिला पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांना असलेली कुलूपे उघडल्याने गंजलेली आहेत. अनेकदा नगरमध्ये दोन गाड्यांचे क्रॉसिंग होते. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गाड्या लागतात. असे दिवसातून अनेकवेळा घडत असते. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. प्लॅटफॉर्म क्रमांक वरील पुरुष महिलांची स्वच्छतागृहे बंद असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. कुलूपच लावायचे होते, तर स्वच्छतागृहे बांधण्यासाठी खर्च का केला, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर स्वच्छतागृह आहे, पण तेथे प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य असते. विशेष म्हणजे या स्वच्छतागृहाला लागूनच उपाहारगृह आहे. याच प्लॅटफॉर्मवरील नव्या प्रतीक्षालयात फक्त महिलांचे स्वच्छतागृहच सुरू असते. पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाला कायम कुलूप असते. स्वच्छतागृहासारख्या प्राथमिक सुविधांना कुलूप लावण्याच्या कारणाचा उलगडा होत नाही. कारण संबंधितांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता सोलापूरला संपर्क साधण्याचा ‘सल्ला’ देण्यात आला. येथे चालणाऱ्या बजबजपुरीविरोधात प्रवासी तक्रारही करण्याच्या फंदात पडत नाहीत. कारण त्यांची दखलच कोणत्याही अधिकाऱ्याकडून घेतली जात नाही.

अनारक्षित तिकिटासाठी केवळ एकच खिडकी
अनारक्षिततिकिटासाठी नगरच्या स्टेशनवर दोन खिडक्यांची व्यवस्था आहे. पण येथील एकच खिडकी सुरू असते. परिणामी गाडी आली, तरी प्रवाशांना तिकीट मिळणे दुरापास्त होते. आरक्षणाच्या बाबतीतही हेच आहे. आरक्षणासाठी तीन खिडक्या आहेत. त्यापैकी एक क्रमांकाची खिडकी कायम बंद असते. दोन तीन क्रमांकाची खिडकी फक्त सकाळी सुरू असते. सायंकाळी मात्र फक्त एकच खिडकी सुरू राहते. त्यामुळे सुरू असलेल्या खिडकीवर रांगा लागतात. या खिडक्यांमधील कर्मचारी दुसरीकडे फिरत असतात, अशी प्रवाशांची तक्रार असते. अनेकदा चौकशीच्या खिडकीतील कर्मचारीही जागेवर थांबत नाही. त्यामुळे इच्छुकांना साधा आरक्षणाचा छापील अर्जही मिळणे दुरापास्त होते.

आरक्षणासाठीची टोकन पद्धत येथेे सुरू झाली आहे. पण हा टोकन क्रमांक मिळण्यात चौकशीच्या खिडकीतील कर्मचारी नसल्यानंतर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ विनाकारण वाया जातो. अनारक्षित तिकीट मिळण्यासाठी फक्त एकच खिडकी सुरू असल्याने लागलेली प्रवाशांची रांग. शेजारील उघड्या खिडकीतील कर्मचारी कामाच्या वेळेत ‘गायब’.

पार्किंग ठेकेदाराकडून लूट
अहमदनगर रेल्वे स्टेशनवर वाहने घेऊन येणाऱ्यांसाठी पार्किंगचे शुल्क आहे दुचाकीसाठी ५, तर चारचाकी वाहनासाठी १० रुपये ठरले आहे. मात्र, ठेकेदाराचे कामगार १० रुपयांची पावती देऊन २०, ३० किंवा रात्री, तर ४० रुपयेही वसूल करतात. त्यामुळे त्यांची अनेकदा प्रवाशांशी बाचाबाची वाद होतात, अशी माहिती रेल्वेच्याच सूत्रांनी दिली.

आरक्षणातील एजंटगिरी सुरूच
तत्काळ आरक्षणाच्या सुविधांबाबतही एजंटगिरीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ती बंद करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आरक्षण खिडकीच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ‘दिव्य मराठी’ने याविरोधात अनेकदा आवाज उठवला आहे.

तृतीय पंथियांची खंडणीशाही
रेल्वेत प्रवाशांना तृतीयपंथियांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अश्लील हातवारे करत तृतीयपंथीय प्रवाशांची अक्षरश: लूट करतात. त्याकडे रेल्वेचे प्रशासन रेल्वे पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तृतीयपंथियांची एक टोळी मनमाडहून बेलापूरपर्यंत असते. बेलापूरला ती उतरून तेथे दुसरी टोळी चढते. ही टोळी नगरपर्यंत असते. प्रवाशांना या दोन टोळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या मागण्या
>स्टेशनपरिसर स्वच्छ दुर्गंधीविरहित असावा.
>प्लॅटफॉर्म परिसरात डासविरोधी औषधांची धुरळणी करावी.
>आरक्षणासाठी असलेल्या सर्व खिडक्या सुरू राहाव्यात.
>स्टेशनवर थंड फिल्टरचे पाणी मिळावे.
>नवे प्रतीक्षागृह त्यातील स्वच्छतागृहांसहित २४ तास सुरू ठेवावे.
>दोन्ही प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतागृहे सुरू ठेवावीत.
>पार्किंगसाठी ठरवून दिलेलेच शुल्क घ्यावे.