आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar, Rainwater Harvesting And AMC Administration

नगर शहरात फक्त 78 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाऊस हाच पाण्याचा मूलभूत स्त्रोत आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हा उत्तम पर्याय आहे. हा उपक्रम राबवणार्‍यांना महापालिकेतर्फे सलग चार वर्षे संकलित करात 5 टक्के सवलत देण्यात येते. मात्र, प्रशासनाने या उपक्रमाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या नगर शहरात फक्त 78 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.

या वर्षी उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होत असला, तरी या पाण्यावर आता अनेकांनी मालकी हक्क दाखवला आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नगरमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. भविष्यात पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली, तर मनपाकडे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे जल अभ्यासक सांगतात.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 140 ‘ब’नुसार शहरातील इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध करांत काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय झाला आहे. सवलत किती व कोणत्या प्रमाणात द्यायची, याबाबतचा निर्णय संबंधित महापालिकांनी घ्यायचा आहे. त्यानुसार नगर महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा व बायोगॅस यापैकी दोन उपक्रम राबवणार्‍या नागरिकांना संकलित करात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 3 वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगचा हा उपक्रम लहान इमारतींसाठी बंधनकारक नसला, तरी 300 चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या हॉस्पिटल्स, शाळा-महाविद्यालये, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्स, तसेच विविध कार्यालयांच्या इमारतींसाठी तो बंधनकारक आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने या उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे.

सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या शहरात गेल्या तीन वर्षांत अवघ्या 78 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासनाने त्या दृष्टीने आतापर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. उपक्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तीन वर्षांत एकही कार्यशाळा घेण्यात आली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक अजूनही या उपक्रमाचे महत्त्व, तसेच मिळणार्‍या सवलतींबाबत अनभिज्ञ आहेत.

दरम्यान, रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवणार्‍या नागरिकांना संकलित करात कायमस्वरूपी एक टक्का सवलत द्यावी, अशी मागणी हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

लोका सांगे ब्रह्मज्ञान..
मोठय़ा इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करणार्‍या मनपाने स्वत: मात्र या उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे. औरंगाबाद महामार्गावरील मनपाची नवीन प्रशासकीय इमारत, सावेडीतील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, मंगल कार्यालये अशा विविध इमारतींवर मनपाने हा उपक्रम राबवलेला नाही. मनपाबरोबरच, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग या सरकारी कार्यालयांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केले आहे.

लवकरच जनजागृती मोहीम
मोठय़ा इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. त्याशिवाय इमारत मालकांना बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला देण्यात येत नाही. लहान इमारतींवरही हा उपक्रम राबवावा, यासाठी मनपाकडून लवकरच जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मनपाच्या मालकीच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.’’
सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख, मनपा

शहराप्रमाणे खेड्यांतही रेनवॉटर हार्वेस्टिंगची आवश्यकता
शहराच्या विविध भागात इमारतींचे बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत 20 अपार्टमेंटमध्ये हा उपक्रम राबवला आहे. घरमालकांचा आग्रह नसला, तरी बांधकाम करताना भविष्याची गरज म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंग व वृक्ष लागवड करण्यात येते. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे.’’ सदानंद कुलकर्णी, बांधकाम व्यावसायिक

असा आहे फायदा
नगर शहरात पावसाची सरासरी 700 मिलिमीटर आहे. एक हजार चौरस मीटरवर पडलेले पावसाचे पाणी साठवले, तर 10 हजार लिटरचे 56 टँकर पाणी उपलब्ध होते. हे पाणी बोअरवेलमध्ये सोडले, तर भूजलपातळी वाढते. त्यासाठी जास्तीत जास्त 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. मनपाकडून मिळणार्‍या कर सवलतीमधून तो वसूल होऊ शकतो.

जनजागृती महत्त्वाची
दरवर्षी वाया जाणारे पावसाचे लाखो लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे साठवले, तर भूजलपातळी निश्चित वाढेल. त्यासाठी मनपाने जनजागृती करून याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. परिणामी दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.’’ संदीप अध्यापक, रेनवॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ