आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन संचालक मंडळाला नोटिसा, लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्थेचा संस्थापक ज्ञानदेव वाफारेसह तत्कालीन संचालकांना आठ दिवसांच्या आत म्हणणे सादर करण्याच्या नोटिसा लेखापरीक्षक डी. एम. बारस्कर यांनी बजावल्या आहेत. लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात असून संचालक मंडळाला म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर लगेचच जिल्हा उपनिबंधकांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

संपदा पतसंस्थेच्या आर्थिक वर्ष 2010-11 व 11-12 च्या लेखापरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. थकबाकीदार कर्जदारांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले आहे. तत्कालीन संचालक मंडळाने कामकाजात अनियमितता, कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर करून संस्थेच्या हिताला बाधा आणल्याचे स्पष्ट झाले असून यासंदर्भात आठ दिवसांच्या आत म्हणणे मांडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संचालक मंडळाला दिलेली मुदत संपल्यानंतर लेखापरीक्षण अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर करण्यात येणार आहे.

ऑगस्ट 2011 मध्ये संस्थापक वाफारेला अटक झाल्यानंतर पोलिसांनी संस्थेचे दफ्तर तपासासाठी जप्त केले. त्यानंतर ठेवीदारांच्या प्रतिनिधींचे प्रशासक मंडळ संस्थेवर नेमण्यात आले. ठेवीदारांच्या वाढत्या तक्रारींमुळे वर्षभरानंतर सप्टेंबर 2012 मध्ये संस्थेवर पुन्हा शासकीय प्रशासक मंडळ आले. तेव्हापासून लेखापरीक्षणाच्या प्रलंबित कामाला गती मिळाली. संबंधित कागदपत्रे पोलिसांकडून मिळत नसल्याने प्रशासक मंडळाला न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांच्या ताब्यातील कागदपत्रे व माहिती प्रशासक मंडळाला मिळाली. विविध अडचणींचा सामना करत प्रशासक मंडळाने लेखापरीक्षणासाठी दफ्तर पूर्ण करून दिले. लेखापरीक्षक डी. एम. बारस्कर यांनी यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रय} केले. संस्थेच्या मुख्य शाखेत साडेतेरा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात संस्थेचे ठेवीदार व कर्जदारांची साधी यादी उपलब्ध होऊ शकलेली नव्हती. मात्र, आता ही माहिती उपलब्ध होत आहे.

संस्थेत 17 हजार जणांची 24 हजार खाती व 32 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे पुढे आले आहे. 13 हजार ठेवीदारांच्या अवघ्या 30 लाखांच्या ठेवी आहेत. दीड हजार ठेवीदारांच्या तब्बल 26 कोटींच्या, तर अडीच हजार ठेवीदारांच्या साडेपाच कोटींच्या ठेवी आहेत. तत्कालीन प्रशासक पांडुरंग गायकवाड, धनंजय गटणे व वसंत गांधी यांच्या कार्यकाळात जवळच्या व्यक्तींना व नातेवाईकांना परस्पर ठेवी परत करण्यात आल्याचे यापूर्वीच्या चौकशीत उघडकीस आले आहे. लेखापरीक्षण अहवाल मिळाल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

संस्थेच्या मोठय़ा ठेवीदारांच्या ठेवी, उत्पन्नाचे स्त्रोत, नावे, पॅनकार्ड व पत्त्याची माहिती 7 फेब्रुवारीला सादर करण्याची नोटीस प्राप्तीकर विभागाने प्रशासक मंडळाला बजावली आहे. सर्वच पतसंस्थांना प्राप्तीकर विभागाकडून अशी नोटीस जाते. मात्र, पतसंस्थांकडून वस्तुनिष्ठ माहिती मिळतेच असे नाही.