आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमधील बहुसंख्य शाळांना खेळाचे वावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, ते शिक्षण, अशी सर्वच शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. शिक्षणामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास होणे या तज्ज्ञांना अभिप्रेत आहे. मात्र, आजच्या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवणारे यंत्र बनवून टाकले आहे. नगर शहर दहावी व बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात अव्वल आले. मात्र, या मागे या विद्यार्थ्यांचा मोठा त्याग आहे. नगरमधील मोठ्या शाळ्यांना साधे मैदानही नाही. ‘दिव्य मराठी’च्या टीमने शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबाबतची शनिवारी माहिती घेतली असता, निराशाजनक चित्र समोर आले.

शहरातील बहुतेक शाळांना मैदानेच नाहीत, ज्या मोजक्या शाळांना मैदाने आहेत, त्या शाळादेखील विद्यार्थ्यांना मैदानावर सोडत नाहीत. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून किमान चार तास, तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून किमान तीन तास खेळाचे असावेत, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु शहरातील शाळांनी हे निर्देश गुंडाळून ठेवत खेळांचे तास कमी केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची खेळाची तहान कशी भागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील समर्थ विद्यालय, सीताराम सारडा, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशाला, सविता रमेश फिरोदिया प्रशाला, वि. ल. कुलकर्णी प्राथामिक शाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय यासारख्या अनेक नामवंत शाळांना मैदानेच नाहीत. अनेक शाळांमध्ये तर क्रीडासाहित्यही नाही, ज्यांच्याकडे आहे, त्याचा उपयोग होत नाही. अनेक शाळांच्या वेळापत्रकात शारीरिक शिक्षणाच्या तासिका नावापुरत्या आहेत. त्या तासिकांवर इतर विषयांच्या जादा तासिकांचे अतिक्रमण सुरू आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील, मात्र हे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम झाले नाहीत, तर ते भावी आयुष्यातील तीव्र स्पर्धेस कसे तोंड देऊ शकतील? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शाळेत जाण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या खासगी शिकवण्या, दिवसभर शाळा आणि शिक्षक व पालकांच्या अभ्यासाच्या दबावामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. मैदानी खेळांचा विसरच मुलांना पडला आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांमध्ये खेळाच्या तासिका घेणे गरजेचे आहे. परंतु शाळा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
तक्रार आल्यास सूचना देऊ
नियमानुसार पाचवी ते आठवीसाठी आठवड्यात किमान चार खेळाचे तास अपेक्षित आहेत. तसेच नववी व दहावीसाठी आठवड्यात प्रत्येकी तीन तास होणे अपेक्षित आहे. यानुसार खेळाचे तास घेणे आवश्यक आहे. जर असे होत नसल्याची तक्रार आल्यास संबंधित शाळेला सूचना देण्यात येतील.’’
अरुण धामणे, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक.
दररोज मैदानी खेळ खेळावेत
विद्यार्थ्यांसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज मैदानी खेळ खेळायला हवेत. खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. खिलाडूवृत्ती निर्माण होऊन विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते. त्यामुळे शाळेत आठवड्यातील किमान चार तास खेळाचे असावेत.’’
अमोल धोपावकर, क्रीडाशिक्षक.
खेळाचा तास अर्ध्याच तासाचा
शहरातील काही शाळांना खेळाची मैदानेच नाहीत. त्यातच आठवड्यात दोन दिवस खेळाचा तास असतो. शालेय तास प्रत्यक्षात अर्र्धा तास असतो. त्यामुळे इच्छा असूनही विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळता येत नाहीत. शालेय व्यवस्थापनाने खेळाचा तास एका तासाचा करावा.’’
शलाखा झावरे, राज्यस्तरीय खेळाडू.
दररोज खेळाचा तास असावा
विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास होण्यासाठी दररोज खेळ खेळणे गरजेचे आहे. अनेक खेळाडू सध्या उच्च्पदावर कार्यरत आहेत. पण स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना खेळायला वेळ मिळत नाही. त्यामुळे दररोज एक तास खेळासाठी द्यावा. खेळ खेळले, तर त्यांचे आरोग्य चांगले राहील.’’
निर्मल थोरात, राष्ट्रीय खेळाडू.
खेळ जोपासणे आवश्यक
४ सध्याच्या प्लॅट संस्कृतीत मुलांना घराजवळ खेळण्यासाठी देखील मैदाने नाहीत. शाळांमध्ये तरी मुलांना खेळता यावे, यासाठी मैदानांची गरज आहे. परंतु शिक्षक खेळण्यासाठी मैदानावर सोडतच नसल्याची तक्रार मुले करतात. स्पर्धेच्या युगात मुलांचे खेळ जोपासणे आवश्यक आहे.’’
छाया नागवडे, पालक.
मैदाने नसल्याचा फलक लावा
४ मुलांना खेळण्यासाठी मैदाने आवश्यक आहेत. मैदाने नसल्यामुळे मुले खेळत नाहीत. परिणामी ते संगणकावर गेम खेळत असल्याने त्यांची शारिरिक वाढ खुंटते. प्रवेश देण्यापूर्वी संबधित शाळांनी मैदान नसल्याचा फलक लावला पाहीजे, त्यामुळे पालकांना शाळेतील सुविधांची योग्य माहिती मिळेल.’’
सुनीता मोरे, पालक.
...तर शाळांना दंड करावा
४ मैदान नसेल तर शिक्षण विभागाने संबधित शाळांना दंड करावा. शाळांमध्ये मैदाने नसल्याने अनेक खेळ मागे पडत चालले आहेत. त्याला शाळाच जबाबदार आहेत. शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी मैदान सक्तीचे करावे, तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे मैदानी खेळ खेळता येतील.’’
पंढरीनाथ गायकवाड, पालक.