आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमले नगर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - हातात भगवे झेंडे, पताका, तसेच ढाल-तलवारी घेतलेले बालमावळे, विद्यार्थिनींचे लेझीम व झांजपथक, घोड्यावर स्वार झालेले बालशिवाजी, टाळ-मृदंग हाती घेतलेले बालवारकरी, नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली, शिवरायांचा दिमाखदार रथ व मुखाने शिवरायांचा जयघोष अशा शिवमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने बुधवारी सकाळी सगळ्या नगरकरांचे लक्ष वेधून घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात जल्लोषात साजरी झाली. राजकीय पक्षांसह वेगवेळ्या संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माळीवाडा बसस्थानकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते सकाळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर संग्राम जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, शिवराज्यचे संजीव भोर, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माधवराव मुळे, जी. डी. खानदेशे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मिरवणुकीत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, महाराष्ट्र बालक मंदिर, वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, गाडगे महाराज प्राथमिक आर्शमशाळेतील विद्यार्थी, तसेच शिवराज्य व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले. शहरातील चौकांमध्ये मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत झाले. मिरवणूक माळीवाडा, कोतवाली पोलिस ठाण्यासमोरुन माणिक चौक, कापड बाजार, नेता सुभाष चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजामार्गे नेण्यात आली. जिल्हा वाचनालयासमोर शिवसेनेतर्फे आमदार अनिल राठोड यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे खाऊवाटप करण्यात आले. दुपारी 1 वाजता न्यू आर्टस् महाविद्यालयासमोरील चौथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.

शिवजयंतीनिमित्त चौका-चौकांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. गुलमोहोर रस्त्यावरील पारिजात चौकात ठाकूरदास परदेशी यांनी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येही शिवजयंती साजरी करण्यात आली.

महावितरणने सकाळी पावणेदहा वाजता विविध ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्याने या गलथान कारभाराविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला. सकाळपासूनच वीज गायब असल्याने विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.

शिवराज्यतर्फे सावेडीतील भिस्तबाग चौकात येथे 17 ते 19 फेब्रुवारी असा तीन दिवसीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे व प्रख्यात कार्पोरेट ट्रेनर अँड. गणेश हलकारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले.

सजीव देखावे ठरले आकर्षण
मिरवणुकीत शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सजीव देखावे सादर केले. शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्या वेशभूषा केलेले देखावे सर्वांचे आकर्षण ठरले. गाडगे महाराज प्राथमिक आर्शमशाळेच्या विद्यार्थ्यांनी देखाव्यातून स्त्री भ्रूणहत्या व व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
शिवजयंती उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी सुमारे तीनशे अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता. एक पोलिस उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, सहा सहायक उपनिरीक्षक, 55 होमगार्ड यांच्यासह मुख्यालय व वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांचा त्यात समावेश होता.