आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Slam Area Boy Going To Singapur For Further Study

संजयनगर झोपडपट्टीतील विकास घेणार सिंगापूर भरारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या एसटी बसस्थानकावर लेमनच्या गोळ्या, शेंगादाणे, बटाटेवडे विकणा-या आणि संजयनगर झोपडपट्टीत राहणा-या विकास गवळीचे सिंगापूरवारीचे स्वप्न आता साकार होणार आहे. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. अतिशय कष्टाने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवलेला विकास पुढील प्रशिक्षणासाठी सिंगापूरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणार आहे.

विकासचे वडील मजुरीचे काम करतात. कामाची शाश्वती नाही. काम मिळाले, तर घरातील पाचजणांचे पोट भरणार. वडिलांच्या व्यसनामुळे येणा-या पैशांनाही पाय फुटत. या मोडक्या संसाराला हातभार लावण्यासाठी विकास लहानपणीच बसस्थानकावर गोळ्या, शेंगादाणे आणि बटाटावडे विकू लागला. शाळा सुटल्यानंतर रात्री नऊपर्यंत बसस्थानकावर विकास काम करायचा. पैसा मिळायला लागल्यावर त्याचे शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागले. परंतु याच दरम्यान स्नेहालयाचा बालभवन प्रकल्प संजयनगरमध्ये सुरु झाला आणि विकासच्या जीवनाला वळण मिळाले. आधी शाळा सोडून इतरत्र उनाडक्या करत फिरणारा विकास पाचवीत पहिला आला. दहावीला 69 टक्के, तर बारावीला 65 टक्के गुण मिळाले.

विकासची शिकण्याची इच्छा पाहून बालभवनचे प्रकल्प समन्वयक हनिफ शेख यांनी त्याला हॉटेल मॅनेजमेंटसाठी न्यू आर्टस महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. गुणवत्तेच्या जोरावर त्याने शिष्यवृत्ती मिळवली. दुपारी दोनपर्यंत कॉलेज करुन रात्री आठपर्यंत बसस्थानकावर एका टपरीत बटाटेवडे बनवण्याचे काम तो करायचा.

सिंगापूरला पंचतारांकीत हॉटेलमध्ये अनुभव घेण्यासाठी जाण्याचे स्वप्न विकासने पाहिले. त्याच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी गरज होती लाखभर रुपयांची. हे पैसे त्याला दान म्हणून नको होते, तर कर्ज म्हणून हवे होते. हनिफ यांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन फेसबुकवर केले. आश्चर्य म्हणजे सहा तासांत सुमारे एक लाख रुपये जमा झाले. मुंबई येथील विद्याधर प्रभुदेसाई यांनी सर्व खर्चाची जबाबदारी उचलली. मदत नंतर इतकी वाढली की, थांबवण्याचे आवाहन करावे लागले. मिळलेल्या मदतीच्या आधारावर विकास आपले पंख पसरवून सिंगापूर भरारी घेणार हे निश्चित झाले आहे.