आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थायीच्या सभेवर विरोधकांचा बहिष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी शिवसेना-भाजप युतीतर्फे बाबासाहेब वाकळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष सभेचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या सभेवर विरोधी राष्ट्रवादी, तसेच मनसेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला होता.

स्थायी समितीची सत्ता ताब्यात ठेवण्यात शिवसेना-भाजप युतीला यश आले आहे. सदस्य निवड, तसेच सभापतिपदाच्या उमेदवारीमुळे मागील काही दिवसांपासून मनपातील राजकीय हालचालींना वेग आला होता. वाकळे यांची सभापतिपदी निवड झाल्यानंतर सर्व हालचाली मंदावल्या आहेत. वाकळे यांनी सुरूवातीपासूनच सावध भूमिका घेत विरोधकांची कोंडी केली . राष्ट्रवादीचे अरिफ शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, वाकळे यांचे फोडाफोडीच्या राजकारण व मनसेची तटस्थ राहण्याची भूमिका यामुळे शेख यांना अर्ज भरण्यासाठी सूचक मिळाला, पण अनुमोदक मिळाला नाही. सभापतिपदासाठी वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. गुरुवारी (2 ऑगस्ट) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वाकळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त स्मिता झगडे, प्रभारी नगरसचिव ए. पी. दुर्गे यांच्यासह समिती सदस्य गणेश कवडे, नितीन जगताप, दिलीप सातपुते, सुमन गंधे, संगीता खरमाळे, नीलिमा गायकवाड व काँग्रेसच्या मोहिनी लोंढे हे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या चार व मनसेच्या दोन सदस्यांनी या सभेकडे पाठ फिरवली. सभापतिपदी निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी वाकळे यांचा सत्कार केला. महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे यांनीही सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
रखडलेल्या कामांना प्राधान्य - सभापतिपदाची सूत्रे शनिवारी (4 ऑगस्ट) स्वीकारणार असून त्यानंतर शहरातील रखडलेली कामे प्राधान्याने मार्गी लावणार आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली सावेडी भुयारी गटार योजना, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शहर विकासासाठी असलेल्या विविध योजनांना चालना देऊन त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ’’ बाबासाहेब वाकळे, सभापती, स्थायी समिती.