आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक येताच उड्डाणपुलाच्या राजकारणाला झाली सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे लोण इतरत्र पसरून याप्रश्नी राजकारण होण्याची अधिक शक्यता आहे.

उड्डाणपुलाचे घोंगडे गेल्या तीन वर्षांपासून भिजत पडले आहे. निविदा कलमानुसार ठेकेदाराने कामाच्या पहिल्या टप्प्यात पुलाचे 25 टक्के काम करणे बंधनकारक होते. मात्र, टोल सुरू करण्यात ठेकेदाराला अडथळा येऊ नये, यासाठी पुलाचे शंभर टक्के काम दुस-या टप्प्यात वर्ग करण्यात आले. दुस-या टप्प्याची वाढीव मुदत संपल्यानंतरही पुलासाठीचे भूसंपादन झाले नाही.
चेतक एंटरप्रायजेस या ठेकेदाराने जानेवारी 2010 पासून या रस्त्यावर टोलवसुली सुरू केली आहे. यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर तीन वर्षांपूर्वी भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली. संपादीत केलेली जागा दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. बांधकाम विभाग व काही राजकीय नेत्यांनी उड्डाणपुलाच्या कामात सुरुवातीपासून खोडा घातला. त्याचीच पुनरावृत्ती करत ठेकेदाराने वाढीव खर्चाची मागणी करत काम सुरू करण्याचे टाळले.

महापालिका निवडणुकीपूर्वी पुलाच्या कामासाठी आंदोलनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय मागे पडला. मात्र, विधानसभा निवडणुकीत उड्डाणपुलाचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने केलेल्या आंदोलनात आमदार राठोड म्हणाले, मंत्र्यांना टोलचालकांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेऐवजी ठेकेदाराच्या हिताला प्राधान्य दिले जाते. राज्यकर्ते निर्ढावले असून जनतेचा जीव जाताना निर्लज्जपणे ते पाहत बसतात. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना नगरकरांच्या प्रश्नांशी काहीही घेणे-देणे नाही. पूल न बांधता ठेकेदार पुलासह सर्व प्रकल्पांची किंमत गेल्या साडेचार वर्षांपासून वसूल करत आहे. उड्डाणपुलाअभावी गेल्या वर्षभरात या ठिकाणी झालेल्या अपघातांत 20 जणांना प्राण गमवावे लागले, तर 10 जण जखमी झाले आहेत.

अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत बाह्यवळणसाठी 14 कोटी देण्याचे आदेश दिल्याची जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र, 14 पैसेही वर्ग झाले नाहीत. मंत्री भंपकबाजी करतात, असा आरोप राठोड यांनी केला. स्वत:च्या जमिनीचे भाव वाढवण्यासाठी बाह्यवळण रस्ता कुठेही व कसाही वळवण्यात आला, असेही ते म्हणाले.

यावेळी भगवान फुलसौंदर, नगरसेवक संजय शेंडगे, दिगंबर ढवण, दत्तात्रेय मुदगल, विजय भांगरे, संजय चोपडा, उमेश कवडे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.

कामगारांना पळवणारेच करतात आता मागणी...
ठेकेदाराने उड्डाणपुलाच्या कामाची चाचपणी सुरू केल्यानंतर तथाकथित नेते असलेल्या शहरातील गुंडांनी सुरूवातीला काम बंद करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. दगडफेक व मारहाण करून कामगारांना पळवून लावण्यात आले. तेच गुंडप्रवृत्तीचे नेते आता पुलाची मागणी करत आहेत, असा आरोप आमदार राठोड यांनी कुणाचेही नाव न घेता केला.

लवादाच्या निर्णयावरच पुलाचे भवितव्य अवलंबून
पुलाच्या वाढीव किमतीवरून ठेकेदार व बांधकाम विभागात सुरू झालेला वाद सोडवण्यासाठी लवाद नेमण्यात आला आहे. लवादाच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून ठेका काढून घेण्याच्या प्रस्तावासह विविध प्रस्ताव शासनस्तरावर धूळखात पडून आहेत. लवादाचा निर्णयच पुलाचे भवितव्य ठरवणार आहे.