आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुका; 6491 उमेदवारांची परीक्षेला दांडी, वेळेआधी पेपर घेतल्याने गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तलाठी भरतीसाठी रविवारी नगर शहरासह जिल्ह्यातील उपकेंद्रांवर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील दोन चुकांमुळे उमेदवारांचा मोठा गोंधळ उडाला.

तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नगर, संगमनेर व श्रीरामपूर या उपकेंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण 60 उपकेंद्रांवर 21 हजार 159 उमेदवार परीक्षा देणार होते. नगर शहरातील 10 उपकेंद्रांवर 13 हजार 224, संगमनेरमधील 14 उपकेंद्रांवर 4 हजार 608 व श्रीरामपुरातील 10 उपकेंद्रांवर 3 हजार 327 उमेदवार परीक्षा देणार होते. एकूण 21 हजार 159 उमेदवारांपैकी 14 हजार 668 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. 6 हजार 491 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. नगर उपकेंद्रावर 13 हजार 224 पैकी 9 हजार 704 उमेदवार हजर होते. 3 हजार 520 उमेदवार गैरहजर होते. संगमनेर उपकेंद्रावर 4 हजार 608 पैकी 2 हजार 797 उमेदवार हजर होते, तर 1 हजार 811 उमेदवार गैरहजर होते.श्रीरामपूर उपकेंद्रावर 3 हजार 327 पैकी 2 हजार 167 उमेदवार हजर होते. 1 हजार 160 उमेदवारांनी दांडी मारली.
परीक्षेत 200 गुणांसाठी 100 प्रश्न होते. 20 व्या क्रमांकाचा प्रश्न प्रश्नपत्रिकेत छापलेलाच नव्हता. प्रश्न नव्हता, मात्र उत्तरांसाठी चार पर्याय पुढे देण्यात आले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांचा मोठा गोंधळ उडाला. 80 क्रमांकाच्या प्रश्नाला एकच पर्याय दोन वेळा विचारण्यात आला. त्यामुळेही काही काळ गोंधळ उडाला.

प्रश्नपत्रिकेबाबत संबंधितांनी नगर येथील महसूल कार्यालयात आपले आक्षेप नोंदवावेत. या आक्षेपांवर समिती चर्चा करुन त्यावर तोडगा काढेल, असे समन्वय अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

अहमदनगर शहराची स्थापना अहमद निझामशहाने कोणत्या वर्षी केली, नगर जिल्ह्यात रांजणखळगे कोठे पाहावयास मिळतात, असे नगरवर आधारित प्रश्न प्रश्नपत्रिकेत होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे (संगमनेर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यावरही प्रश्न होता. या परीक्षेसाठी बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, कल्याण, वाशीम, अकोला, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात उमेदवार आले होते. परीक्षेसाठी 1 हजार 850 कर्मचारी व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आधीच पेपर घेतला
पाच मिनिटे अगोदरच सूचक घंटा वाजली. ही शेवटची घंटा आहे, असे वाटल्याने पर्यवेक्षकांनी पेपर घेतले. वर्गाबाहेर पडल्यानंतर शेवटची घंटा वाजली. शेवटचा कालावधी महत्त्वाचा असतो. अगोदर पेपर घेतले गेले नसते, तर 10 प्रश्न सोडवता आले असते.’’
योगेश तांगडे, उमेदवार