आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मानासाठी शिक्षकाचा लढा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देश प्रेमाने भारवलेले पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील माध्यमिक शिक्षक फकिर शहाजान शेख हे गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमानाविरुद्ध लढा देत आहेत. राष्ट्रीय प्रतीकांमधील चुका दुरुस्त व्हाव्यात, यासाठी ते शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. शासनानेही त्यांच्या तक्रारींची दखल घेत काही चुका दुरुस्त केल्या. हा लढा यापुढेही असाच सुरू राहणार असल्याचे शेख यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले.
राष्ट्रध्वज असो की, अन्य प्रतीके, त्यांचा कुठे अवमान झाला, तर त्याविरोधात शेख आवाज उठवतात. देव-देवता नेत्यांचा नकळत अवमान झाला तरी समाज संतापतो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत राजमुद्रा या राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान झाला, तर हाच समाज गप्प बसतो. ध्वजवंदन करताना ध्वजाची अवस्था, त्याची घडी, राष्ट्रध्वज उलटा लावणे, अशोकचक्रामधील आऱ्या कमी करणे, राजमुद्रेखाली "सत्यमेव जयते' हे बोधवाक्य नसणे, योग्य त्या चालीत राष्ट्रगीत म्हणणे अशा अनेक चुका घडत असतात. परंतु याबाबत फारसे कुणी बोलत नाही. माध्यमिक शिक्षक शेख मात्र राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमानाविरोधात गेल्या बारा वर्षांपासून लढा देत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनावरील राजमुद्रेच्या खालील वगळलेली "सत्यमेव जयते' ही अक्षरे असो, चलनी नाेटांवरील राजमुद्रा, तसेच पाठ्यपुस्तकांमधील राष्ट्रध्वज त्यावरील अशोकचक्रामधील चुका सुधारण्यासाठी शेख यांनी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. यापुढेहीदेखील आपला हा लढा सुरूच राहणार असल्याचे ते सांगतात.

राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व

राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान. राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व प्रत्येकाला समजले पाहिजे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान थांबवण्यासाठी तरुणांनीही पुढे आले पाहिजे.'' फकिरशहाजान शेख, शिक्षक, तिसगाव, ता. पाथर्डी.

व्यापक जनजागृती हवी

प्रदूषण,पोलिओ लसीकरण, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर सरकारकडून जनजागृती करण्यात येते. राष्ट्रीय प्रतीकांबाबतही अशीच व्यापक स्वरूपात जनजागृती झाली पाहिजे. त्याशिवाय राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व जनतेला कळणार नाही. राष्ट्रध्वजाबाबतही अनेकांना पुरेशी माहिती नाही. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, अभिनेते, खेळाडूंनी काम केले पाहिजे, अशी शेख यांची अपेक्षा आहे.