आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील शिक्षक दिन समारंभात नगर येथील प्राचार्य सुनील पंडित व शर्मिला पाटील यांचा गौरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षक हेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांनी ठरवले तर देश महासत्ता बनू शकतो, असे सांगत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशभरातून आलेल्या आदर्श शिक्षकांचा सन्मान केला. त्यात नगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य सुनील पंडित केडगाव येथील अंबिका विद्यालयातील शिक्षिका शर्मिला महेश पाटील यांचा समावेश होता. 
 
प्राचार्य पंडित पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा नवी दिल्लीत गौरव करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांनी राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारला. यावेळी मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. प्रास्ताविक मानव संसाधन राज्यमंत्री उपेंद्र खुशावह यांनी केले, तर आभार शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी मानले. 
 
उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, आदर्श शिक्षक देवासमान असतात. सुसंस्कृत पिढी ते घडवत असतात. बलशाली भारत निर्माण करण्यात अशा शिक्षकांचे मोठे योगदान आहे. जावडेकर म्हणाले, या पुरस्काराने आदर्श शिक्षकांना शाबासकीची थाप मिळाली आहे. संसदेतील खासदारांपैकी ६० जण शिक्षकी पेशातील असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. पुरस्कार वितरणानंतर राष्ट्रपती भवनात चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रपतींनी शिक्षकांसमवेत संवाद साधत शिक्षक हेच देशाचे खरे आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. 
बातम्या आणखी आहेत...