आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagar To Pune ST Bus Service Start From June 1948

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस बंदोबस्तात नेली होती, पुण्याला पहिली एसटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन धावणारी आजची एसटी १९४८ मध्ये प्रथमच नगर-पुणे या मार्गावर धावली. या प्रवासी वाहतूक सेवेचा पहिला वाहक होण्याची संधी मिळाली. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती, त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्तात माळीवाडा ते पुणे अशी बस नेता आली, अशी माहिती पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांनी दिली.
महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाने नगर ते पुणे या मार्गावर जून १९४८ रोजी पहिली बससेेवा सुरू झाली. एसटीच्या या प्रवासाला सोमवारी ६७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिशा परिवारातर्फे अश्विनी उगले यांनी शाल, पुष्पगुच्छ, मिठाई पोषाख भेट देऊन केवटे यांचा सत्कार केला. याप्रसंगी केवटे बोलत होते.
केवटे म्हणाले, जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली. त्यावेळी किसन राऊत हे बसचे चालक होते, असे केवटे यांनी सांगितले.
केवटे यांचे वय ९१ वर्षे अाहे. भविष्य सल्लागार अतुल खिस्ती यांना ते गुरुस्थानी मानतात. परिवहन दिनानिमित्त तारकपूर आगारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केवटे, विभागीय वाहतूक अधिकारी आर. एस. शिरसाठ, विभागीय वाहतूक अधीक्षक एस. व्ही. खोल्लम, एस. एम. मेहेत्रे, अर्जुन गुजर, आगार व्यवस्थापक प्रमोद नेहूल आदी उपस्थित होते.
सुवासिनींनी केले पहिल्या एसटीचे स्वागत
पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे, असेही केवटे यांनी सांगितले.