नगर - नगर अर्बन बँकेत सन २००९-१० या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटले, तरीही आराेपींवर कारवाई झालेली नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, बँकेत २००९-१० या आर्थिक वर्षात कोटी ७६ लाख ३८ हजारांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षक चंद्रकांत पवार यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १० फेब्रुवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल झाला. विद्यमान अध्यक्ष खासदार दिलीप गांधी, विद्यमान संचालक, माजी संचालक, अधिकारी कर्मचार्यांसह ५४ जणांविरुद्ध फसवणूक इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. लेखापरीक्षणात अनेक गंभीर बाबी आढळल्या. नियमबाह्य कर्ज मंजूर करणे, कर्तव्यात कसूर, तसेच कर्जदाराला गैरप्रकारे लाभ दिल्याचा आरोप संबंधितांवर आहे. बँकेच्या पुणे येथील सदाशिव पेठ शाखेतून नियमबाह्य वाहनकर्ज, काष्टी शाखेतील नियमबाह्य सोनेतारण कर्ज, एकरकमी कर्जफेड योजनेचा कर्जदारांना नियमबाह्य लाभ, रिझर्व्ह बँकेच्या कर्जमर्यादेचे उल्लंघन असे अनेक गैरव्यवहार आरोपींनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कोतवाली पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्याला तीन महिने होत आले, तरीही खासदार गांधी यांच्यासह ५४ जणांपैकी एकाविरुद्धही पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. पोलिस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे. खासदार गांधी यांच्यासह गुन्हा दाखल असलेल्या सर्वच आरोपींना अटक करून तपास करावा; अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.