आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Urban Bank News In Marathi, Sugar Cooperative Factory, Divya Marathi

नगर अर्बन बँकेचे पाच सहकारी साखर कारखान्यांनी थकवले 16 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर अर्बन बँकेचे 46 कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यापैकी 16 कोटी पाच सहकारी साखर कारखान्यांकडे, तर 20 कोटी बड्या व्यापार्‍यांकडे थकीत आहेत. त्यापैकी दोघांविरुद्ध जप्तीची कारवाई सुरू आहे, अशी माहिती बँकेचे प्रभारी अध्यक्ष विजय मंडलेचा यांनी सोमवारी दिली. बँकेच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, प्रभारी व्यवस्थापक नवीन गांधी आदी यावेळी उपस्थित होते.
नगर अर्बन बँकेला सरत्या आर्थिक वर्षात आठ कोटी 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ढोबळ नफा पावणेसतरा कोटी 67 लाख असून करपूर्व नफा पावणेबारा कोटी 12 लाख रुपये झाला आहे. गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवी शंभर कोटींनी वाढून त्या 877 कोटी 53 लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत, शाखांची संख्या 47, तर बँकेच्या सभासदांची संख्या 1 लाख 6 हजार झाली असल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.
मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सभासदांनी 31 मार्च 2013 पूर्वी एक हजार रुपयांचे शेअर्स घेण्याचा बँकेने नियम केला होता. त्यावर सध्या वाद सुरू आहे. मात्र, बँकेने तो सभासदांच्या हितासाठीच नियम केल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सर्वसाधारण सभासद व नाममात्र सभासद या दोनच प्रकारात सभासदांचे वर्गीकरण होणार आहे. 60 रुपये शेअर्सधारकांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. मतदानाच्या 60 दिवस अगोदर एक हजार रुपयांचा शेअर घेणार्‍या सभासदांना त्यांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवता येणार आहे. यासाठी सर्व शाखांमध्ये ग्राहक मेळावे घेण्यात येत आहेत. एक हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे शेअर्स सभासदांसाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती गांधी यांनी दिली. व्यापार्‍यांपैकी फक्त दोन व्यापार्‍यांविरोधातच कारवाई सुरू असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.
सर्व संचालकांना माहितीच नाही..
लोकसभेच्या निवडणुकीत खासदार दिलीप गांधी यांच्यावर अर्बन बँकेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घाईघाईत घेण्यात आली. गांधी विरोधकांकडे दुसरा मुद्दा नसल्याने ते अर्बन बँकेला निवडणुकीत ओढत आहेत. बँक ही आर्थिक संस्था आहे. तिला राजकारणात ओढू नका, असे आवाहन बँकेचे सत्ताधारी संचालक अनिल कोठारी यांनी वारंवार केले, तरी बँकेवर होणार्‍या आरोपांची छाया या पत्रकार परिषदेवर पडली होती. दरवर्षी मे महिन्यात होणारी ही पत्रकार परिषद यावर्षी एप्रिलमध्येच घेण्यात आली. पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती आधी संचालक मंडळापुढे न मांडता व संचालकांची मंजुरी न घेताच जाहीर करण्यात आल्याची माहिती एका संचालकाने दिली. बँकेत अनेक गैरव्यवहार झाले असतानाही तसे काही झालेच नाही, असा अविर्भाव संचालकांनी घेतला. वास्तविक पाहता गैरव्यवहारांबाबत लेखा परीक्षकांनी अतिशय वाईट शेरे मारलेले आहेत, तरीही सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ठेवींत व नफ्यात कशी वाढ होत आहे, हे सांगण्यात संचालक धन्यता मानत होते.
‘राष्ट्रवादी’ थकबाकीदार
बँकेच्या प्रमुख थकबाकीदारांत पाच सहकारी साखर कारखाने आहेत. बहुतेक सर्व कारखान्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांची सत्ता होती. गणेश सहकारी साखर कारखाना (चार कोटी 1 लाख), जगदंबा (पाच कोटी 35 लाख), अगस्ती (10 कोटी 55 लाख), नगर (चार कोटी 25 लाख), पारनेर (30 लाख 39 हजार) अशी कारखाने व त्यांच्याकडील थकबाकी असल्याचे बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांनी सांगितले.
गैरव्यवहारामुळे नफा घटला
बँकेचे वसूल भांडवल सुमारे 17 कोटी आहे. त्यावर 15 टक्के व्याज गृहित धरले, तर ते सुमारे अडीच कोटी होतात. बँकेचा राखीव निधी 126 कोटी 43 लाख रुपये आहे. त्यावरही 15 टक्के व्याज गृहित धरले, तर ते 19 कोटी होतात. बँकेच्या ठेवी 877 कोटी आहेत. त्यावर नफा 2 टक्के जरी धरला, तरी तो साडेसतरा कोटी होतो. म्हणजे बँकेचा ढोबळ नफा 39 कोटी होतो. त्यापैकी दहा कोटी खर्च जरी धरला, तरी बँकेला 29 कोटींचा नफा व्हायला हवा. सध्या देशभरातील बँकांच्या ठेवींत 17 टक्क्यांची वाढ होत आहे. अर्बन बँकेत ती 12 टक्क्यांच्या दरम्यानच आहे. याचा अर्थ बँकेत मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याने नफ्याबरोबरच ठेवींच्या वाढीतही घट होत आहे. गेल्या चार वर्षांत वैधानिक लेखा परीक्षणात या बँकेतून पैशांची कशी लूटमार सुरू आहे, याची तपशीलवार नोंद आहे. त्याबाबत 4 चौकशा प्रलंबित आहेत. चुकीच्या कागदपत्रांद्वारे बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळवल्याच्या दोन चौकशा पूर्ण होऊन त्यात गांधी दोषी आढळले आहेत. त्यांना राजकीय फायदा मिळवून देण्यासाठीच या पत्रकार परिषदेची घाई करण्यात आली आहे.’’ गिरिधारीलाल मध्यान, उद्योजक व बँकेचे वरिष्ठ सभासद.
व्यापार्‍यांना मात्र ‘अभय’
पाच साखर कारखान्यांची नावे तातडीने सांगणार्‍या संचालकांनी थकबाकीदार व्यापार्‍यांची नावे सांगण्यास मात्र नकार दिला. पत्रकारांनी वारंवार मागणी करूनही ही नावे जाहीर करता येणार नाहीत. त्यासाठी एक ‘प्रोसेस’ आहे, असे संचालक सांगत राहिले. विशेष म्हणजे 20 कोटींहून अधिक थकबाकी असलेल्या या व्यापार्‍यांपैकी फक्त दोन व्यापार्‍यांविरोधातच कारवाई सुरू असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.