आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्याच्या पाण्याची बोंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पंपिंग स्टेशनमधील बिघाड, महावितरणचा शटडाऊन, फुटलेली जलवाहिनी, अशा अनेक कारणांमुळे शहरात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या विविध भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच महापालिकेचे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे.

मुळानगर येथील पंपिंग स्टेशनमधील 560 अश्वशक्तीच्या पंपात आठ दिवसांपासून बिघाड झाल्याने पाणीउपशावर परिणाम झाला आहे. परिणामी संपूर्ण शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, उपलब्ध पाण्याचे वितरण योग्य पध्दतीने होत नसल्याने शहराच्या विविध भागांत गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांकडून मनमानी पध्दतीने पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून काही भागात मुबलक पाणी सोडण्यात येत आहे. काही ठिकाणी मात्र वारंवार तक्रारी करूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. मध्यवर्ती शहरासह पाइपलाइन रोड, भिस्तबाग परिसर, सिव्हिल हडको, मुकुंदनगर आदी भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने नळाला इलेक्ट्रिक मोटार जोडून पाणी भरावे लागत आहे. परंतु नळाला कमी दाबाने पाणी येत असल्याने अनेक ठिकाणी मोटार जोडूनही पाणी भरता येत नाही. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांकडे तक्रार केली, तर पंपिंग स्टेशमध्ये बिघाड झाला आहे, पाइपलाइन फुटली आहे, दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देवून नागरिकांची बोळवण केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मनपाने घेतला आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मुळा धरणात सध्या दोन हजार 200 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 7 हजार 800 दलघफू झाला आहे, तरीदेखील मनपाला अतिरिक्त पंप जोडून पाणी उपसा करावा लागत आहे. मात्र, आठ दिवसांपासून या पंपात बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

मनपाची पाण्याची वितरण व्यवस्था चार दशकांपूर्वीची असल्याने दर आठ-पंधरा दिवसांनी तिच्यात बिघाड होतो, तसेच पाणी योजनेसाठी लागणार्‍या वीजपुरवठय़ातही वांरवार बिघाड होतो, त्यामुळे महावितरणकडूनही दुरुस्तीच्या नावावर वारंवार शटडाऊन घेण्यात येतो. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही भागात सलग चार-पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांवर पाणी विकत घेण्याची वेळ येते.

दुरुस्तीचे काम पूर्ण
मुळानगर पंपिंग स्टेशनमधील अतिरिक्त पंपात बिघाड झाल्याने पाणीउपशावर परिणाम झाला होता. त्यामुळेच चार-पाच दिवसांपासून काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, आता पंपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्यात आलेले आहे.’’ एम. डी. काकडे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष
नळाला इलेक्ट्रिक मोटार जोडली, तर ती जप्त करावी, असे आदेश असतानाही पाणीपुरवठा विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत सर्रास मोटार जोडून पाणी भरण्यात येत असल्याने अनेक वसाहतींमधील शेवटच्या घरापर्यंत पाणीच पोहोचत नाही. आधीच नळाला कमी दाबाने पाणी, त्यात मोटारी जोडल्या, तर परिसरातील अनेकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे.

अभियंत्याकडून उडवाउडवीची उत्तरे
भिस्तबाग परिसरातील गजराज फॅक्टरीच्या समोरील भागात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले, परंतु दाब कमी असल्याने हंडाभर पाणीदेखील भरता आले नाही. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांकडे दूरध्वीनवरून तक्रार केली, तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.’’ नितीन एकशिंगे, नागरिक.