आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील पाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावा, मंत्री दिलीप सोपल यांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील विविध पाणी योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत. प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता आदी कारणांस्तव योजना रेंगाळल्या असल्यास संबंधित अधिकार्‍यांनी याबाबत पाठपुरावा करावा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी दिले.

सोपल यांच्या उपस्थितीत सोमवारी त्यांच्या दालनात पाणी योजनांबाबत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विनंतीवरुन ही बैठक बोलावण्यात आली. आमदार चंद्रशेखर घुले, शेवगावचे सभापती अरुण लांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत लांडगे, कार्यकारी अभियंता जी. बी. सागू आदी या वेळी उपस्थित होते. दुष्काळी स्थिती संपली असली, तरी जिल्ह्यातील काही गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जिल्हा कायमचा टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. काही योजनांची कामे सध्या सुरू आहेत, तर काही योजना प्रशासकीय, तांत्रिक किंवा इतर प्रकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकार्‍यांनी याचा पाठपुरावा करून जिल्ह्यातील सर्व पाणी योजना मार्गी लावाव्यात, असे सोपल या वेळी म्हणाले.

शेवगाव-पाथर्डी व परिसरातील 54 गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. शहर टाकळी व परिसरातील 28 गावांसाठीच्या योजनेचे नूतनीकरण केले जात आहे. या योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावीत, असे सोपल म्हणाले. शिर्डी परिसरातील लोणी बुद्रुक व खुर्द, आडगावसह परिसरातील इतर दोन गावे, पिंपरी निर्मळ, वाढीव राहाता, विस्तारित पुणतांबा योजना, पानोडी व इतर 9 गावांची योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे.