आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महावितरणच्या गलथान कारभारामुळे नगर शहराचा पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. पाणी योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नियमित पाणीपुरवठा करणे महापालिकेला कठीण होत आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीत टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात जवळपास तीन महिने पाणीकपात सुरू होती. मागील महिन्यात मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसांत पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. एकीकडे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे नगरकरांची पाण्यावाचून गैरसोय होत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील पंधरा दिवसांपासून अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

बुधवारी (11 सप्टेंबर) घरोघर गौरींचे आगमन होणार असल्याने मनपाने कोणतीही पूर्वकल्पना न देता शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा केला. मात्र, दुसर्‍या दिवशी पाणी न सोडल्याने अनेकांना टँकरने पाणी आणावे लागले. सावेडी उपनगरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना थेट नळालाच इलेक्ट्रिक मोटार जोडून पाणी भरावे लागते. विविध भागांत मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची ओरड सुरू आहे. वेळेत व पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने नागरिकांना नाईलास्तव हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.

केडगाव, सारसनगर, तसेच मुकुंदनगर भागातील पाणीप्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. मुकुंदनगरमधील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार अनिल राठोड यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आठ दिवसांत शहरात पुन्हा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईला नागरिकांनी आतापर्यंत तोंड दिले. मनपाने घेतलेल्या पाणीकपातीच्या निर्णयालाही नगरकरांनी सहमती दर्शवली. परंतु आता महावितरणच्या गलथान कारभारामुळे नगरकरांना पुन्हा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महावितरणमुळेच पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याचे मनपा अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, तर मनपाने पाणीपुरवठय़ासाठी अद्ययावत यंत्रणा उभारावी, असे महावितरणचे म्हणणे आहे. दोघांच्या भांडणात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होत आहे.

ट्रान्सफार्मर बिघडल्याने अडचण
मुळा धरणासाठी वीजपुरवठा करणारे एमआयडीसीतील ट्रान्सफार्मर आठ-दहा दिवसांपासून नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे मनपाच्या पाणी योजनेसाठी राहुरी येथून वीजपुरवठा सुरू आहे. हा पल्ला सुमारे 60 किलोमीटरचा आहे. पावसामुळे किंवा व्होल्टेज कमी जास्त झाल्याने वीज ट्रीप होते. मात्र, पाच मिनिटांनंतर वीजपुरवठा पूर्ववत होतो. यामुळे जर महापालिकेची यंत्रणा कोलमडत असेल, तर त्यांनी त्यांची यंत्रणा अद्ययावत करून घ्यावी. एमआयडीसीत नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी (13 सप्टेंबर) टेस्टिंग झाल्यानंतर हा ट्रान्सफार्मर सुरू होईल.’’ धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता, महावितरण.

ऐन पावसाळ्यात पाणी मिळेना
महावितरण व महापालिकेत समन्वय नसल्याने शहरात भर पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. सध्या सुणासुदीचे दिवस असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात.’’ विजय पवार, नागरिक.

वीजपुरवठा वारंवार खंडित
मागील पंधरा दिवसांत लोडशेडींग व दुरुस्तीसाठी किती वेळा वीजपुरवठा खंडित झाला, याचे रेकॉर्ड महापालिकेकडे आहे. गुरुवारचा अपवाद वगळता रोज काहीना काही कारणांनी वीजपुरवठा खंडित होतो. पाच मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला, तरी पाणी उपसा दोन तास बंद होतो. याबाबत महावितरणशी बोलणे झाले आहे. ’’ परिमल निकम, पाणीपुरवठा विभागप्रमुख.