आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Water Tanker Corruption Issue Four People Suspected

टँकर घोटाळ्यात चौघांवर ठपका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पारनेर तालुक्यात टँकरच्या अंतरात घोळ करून सुमारे ७३ लाखांची अनियमितता झाल्याचा प्रकार दीड वर्षापूर्वी उघड झाला होता. याप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत पंचायत समितीमधील चार अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली.

महसूल विभागाच्या आदेशानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून टँकरचे नियोजन केले जाते. पारनेर पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांनी टँकरच्या खेपांसाठी वाढीव अंतर दाखवल्याने त्याचा फायदा ठेकेदाराला झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. या चौकशीचा अहवाल महिनाभरापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर झाला असून त्यात चार कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. परंतु अधिकाऱ्यांनी कारवाईस चालढकल केली. हा घोटाळा नसून ही अंतरातील अनियमितता होती. त्यामुळे अपहार झालेल्या रकमेचा भरणा शासनाकडे करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील कारवाईची धार बोथट झाल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दोषींवर कारवाई करण्यास होतेय टाळाटाळ
चौकशी अहवालाची फाईल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. तथापि, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनाच ही फाईल नेमकी कुणाच्या टेबलवर आहे, याची माहिती नाही. कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधित कर्मचारी कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाकडूनच चौकशी होऊनही कारवाई होण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.