आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन तक्रारीची जिल्हा परिषदेत सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेत येणा-या टपालापैकी ८१ टक्के टपाल कर्मचा-यांनी दिल्याचे प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले. तक्रारीसाठी जाणारा कर्मचा-यांचा वेळ वाचवून कारभार अधिक पारदर्शी करण्यासाठी नवीन संकेतस्थळ निर्माण करून कर्मचा-यांसाठी ऑनलाइन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात हा उपक्रम राबवणारी अहमदनगर जिल्हा परिषद पहिलीच आहे. या सुविधेमुळे जिल्हा परिषदेतील गर्दी कमी होणार आहे.

जिल्हा परिषदेत येणा-या टपालातील प्रकरणांचा निपटारा होण्यास विलंब होत असल्याने, तसेच टपाल गहाळ होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी काही महिन्यांपूर्वी राज्यात सर्वप्रथम मध्यवर्ती टपाल कक्ष सुरू केला. या कक्षात आलेले टपाल संबंधित विभागात सादर करून ते नेमके कोणाकडे पोहोच झाले याची माहिती उपलब्ध झाली. या कक्षाचा दर आठवड्याला आढावा घेत असताना आलेल्या टपालांची छाननी केल्यानंतर सर्वाधिक ८१ टक्के टपाल आस्थापनाविषयक कर्मचा-यांनी पाठवल्याचे आढळून आले.

जिल्हा परिषदेंतर्गत पंचायत समिती, ग्रामपंचायतींत ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांच्या तक्रारी अधिक असल्याने जिल्हा परिषदेत मोठी गर्दी होत होती. अधिकारी व कर्मचा-यांचा बहुतेक वेळ तक्रारींचा निपटारा करण्यातच जात होता व विकासकामांच्या फायली प्रलंबित राहात होत्या. तसेच कर्मचारी आपले मुख्यालय सोडून जिल्हा परिषदेत येत असल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊन त्यांची कामे प्रलंबित रहात होती. कर्मचा-यांना ओळखपत्र सक्तीचे करून तालुकास्तरावरील प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी कर्मचारी अदालत सुरू करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील गर्दी गेल्या काही दिवसांपासून ओसरू लागली आहे. कर्मचा-यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी nagarznivara.com या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचा-याला तक्रारीची रिसीट उपलब्ध होईल. त्यानंतर पुन्हा तक्रारीवर अथवा मागणीवर काय कार्यवाही झाली याची माहिती ऑनलाइन कळणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

तक्रारीनंतर काय?
ऑनलाइन तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाच्या बॉक्समध्ये आपोआप ती तक्रार पोहोचणार आहे. या तक्रारीवर संबंधित विभागाने काय कारवाई केली याचे नियंत्रण सामान्य प्रशासन विभाग करणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दर आठवड्याला त्याचा आढावा घेणार आहे. संबंधित कर्मचा-या तक्रार क्रमांकाच्या रिसीटनुसार तक्रारीवर काय कारवाई झाली याची माहिती मिळेल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून प्रयोग
कर्मचारी आपल्या मुख्यालयात थांबत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नागरिकांची ही अडचण केंद्रस्थानी ठेवून सर्वप्रथम कर्मचा-यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली. १५ एप्रिलपासून नागरिकांसाठीही असे संकेतस्थळ सुरू करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या ठरावीक वेळेत सोडवण्याचेही बंधन संबंधित विभागावर घातले जाईल.'' शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.