आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Zilha Parishad News In Marathi, Website, Divya Marathi, Officer

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील तपशिलात अनेक चुका, जुन्याच अधिका-यांची नावे तशीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ आहे. मात्र, या संकेतस्थळाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. विभागातील माहिती अधिकार या रकान्यातील मजकूर जुनाच आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेचे चुकीची माहिती नागरिकांपर्यंत जात आहे.

जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणा-या शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेला सहज व सोप्या पद्धतीने मिळवता यावी, यासाठी सरकारने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना त्यांचे संकेतस्थळ मराठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ काही वर्षांपूर्वी सुरू झाले. ग्रामीण भागात इंटरनेटचा फारसा प्रसार नसला, तरी ग्रामीण भागातील अनेक तरुणांकडून या संकेतस्थळाचा वापर केला जातो. आतापर्यंत सुमारे 4 लाख 26 हजार 526 जणांनी हे संकेतस्थळ पाहिले आहे. या संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील रिक्त जागांसाठी भरतीच्या जाहिराती, तसेच सर्व विभागांतील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळ ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, बांधकाम (उत्तर), बांधकाम (दक्षिण), लघु पाटबंधारे, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, आरोग्य, माध्यमिक शिक्षण या विभागाच्या लिंक आहेत. या प्रत्येक विभागावर क्लिक केल्यानंतर त्या विभागाची रचना, योजना, निविदा, फोटो गॅलरी, अर्जाचे नमुने, यशोगाथा व माहिती अधिकार यांची माहिती मिळते.

‘माहिती अधिकार’ या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यात विभागाची संपूर्ण आस्थापना, कार्यपद्धती जबाबदारी आदींची माहिती उपलब्ध होते. मात्र, वर्षभरापासून काही विभागातील माहिती अधिकार या रकान्यातील माहिती अद्ययावत केलेली नाही. अनेक अधिकारी व कर्मचारी केव्हाच बदलून गेले, मात्र त्यांची नावे या संकेतस्थळावर अजून झळकत आहेत. चुकीची माहिती उपलब्ध होत असल्यान नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वास्तविक संकेतस्थळामुळे माहिती अधिकारात अर्जांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती. परंतु माहिती चुकीची असल्याने माहिती अधिकारांतर्गत आलेल्या अर्जांची गर्दी वाढली आहे. इतर कार्यालयीन कामात व्यग्र असलेले जिल्हा परिषदेचे अधिकारी संकेतस्थळाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हे चुकीचे आहे...
माहिती अधिकारावर क्लिक केल्यानंतर अर्थ विभागातील अधिका-यांची यादी समोर येते. त्यावर अजूनही माजी लेखा व वित्त अधिकारी के. एस. साळुंखे यांचे नाव आहे. वास्तविक या पदावर सध्या अरुण कोल्हे कार्यरत आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर जगन्नाथ भोर यांचे नाव आहे. मात्र, या पदावर सध्या अनंत महाजन आहेत. दक्षिण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर अजूनही पी. पी. खंडागळे यांचे नाव आहे. आरोग्य विभागातील दोन आरोग्य अधिकारी बदलून गेले, तरी 2008 मध्ये रुजू झालेल्या डॉ. ए. पी. खाडे यांचे नाव तेथे आहे. वास्तविक या पदावर सध्या डॉ. पी. डी. गांडाळ कार्यरत आहेत.

ही तर जनतेची फसवणूक
पारदर्शकपणाचा दावा करणा-या जिल्हा परिषद प्रशासनाने संकेतस्थळ अपडेट केलेले नाही. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे जनतेची फसवणूक होत आहे. अशी खोटी माहिती देणा-या व संकेतस्थळ अद्ययावत न करणा-या कर्मचा-यांवर व अधिका-यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी कारवाई करावी. अधिका-यांची नावे चुकीची असल्याने संकेतस्थळावरचा विश्वास उडाला आहे. प्रशासनाने माहिती दडवण्याचा हा प्रकार थांबवावा.’’
बाळासाहेब हराळ, सदस्य, जिल्हा परिषद